AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखर कडू झाल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर दुप्पट, तर लसूण 200 रुपयांवर

ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महिनाभरात साखरेच्या किमती 30 टक्क्यांनी वाढून 70 रुपये प्रति किलोवर पोहोचल्या आहेत. साखरेच्या या दरवाढीतच आता कांदा 25 रुपयांवरून थेट 50 रुपयांवर गेला आहे, तर लसणाने 200 रुपयांचा टप्पा ओलांडल्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकघराचे गणित पुरते बिघडले असून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

साखर कडू झाल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर दुप्पट, तर लसूण 200 रुपयांवर
Onion
| Edited By: | Updated on: Aug 26, 2026 | 10:36 AM
Share

देशात अन्नधान्य महागाईने डोके वर काढले असून साखर, कांदा आणि लसूण कमालीचे महागले आहेत. बाजारातील घटलेली आवक आणि वाढत्या किमती पाहता केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वेद्वारे विशेष ‘कांदा एक्सप्रेस’ धावणार असून, ग्राहकांना 35 रुपये किलोने सवलतीत कांदा उपलब्ध करून दिला जात आहे.

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या महिनाभरात साखरेच्या दरात तब्बल 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. 24 जुलै रोजी साखरेची किरकोळ किंमत 48 रुपये प्रति किलोच्या आसपास होती, ती 24 ऑगस्टपर्यंत 63 ते 65 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे, तर काही राज्यांमध्ये हा दर थेट 70 रुपयांच्या पार गेला असल्याचे एक वेबसाईटच्या रिपोर्टमधून समोर आले आहे.

किरकोळ आणि घाऊक बाजारातील वस्तूंचे चालू दर खालीलप्रमाणे

साखर (किरकोळ दर): देशातील सरासरी किरकोळ बाजारात साखरेचा भाव 63 ते 65 प्रति किलो आहे, तर काही राज्यांमध्ये तो 70 पर्यंत पोहोचला आहे.

साखर (घाऊक दर): घाऊक बाजारात साखरेचा सरासरी दर 58.29 ते 59.23 प्रति किलो (सुमारे 5,800 ते 6,000 प्रति क्विंटल) आहे.

कांदा (किरकोळ दर): सर्वसामान्य ग्राहकांसाठी किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 45 ते 50 प्रति किलो असून काही शहरांमध्ये तो थेट 60 ते 65 पार गेला आहे.

कांदा (घाऊक दर): महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (APMC) कांद्याचा घाऊक दर 2,600 ते 3,850 प्रति क्विंटल (म्हणजेच 26 ते 38.50 प्रति किलो) आहे.

कांदा (सरकारी सवलत दर): केंद्र सरकारच्या नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) केंद्रांवर कांदा 35 प्रति किलो या विशेष सवलतीच्या दराने विकला जात आहे.

लसूण (किरकोळ दर): बाजारात चांगल्या दर्जाच्या लसणाचा किरकोळ दर थेट 200 प्रति किलोच्या वर पोहोचला आहे.

लसूण (घाऊक दर): महाराष्ट्रातील प्रमुख मार्केटमध्ये लसणाचा घाऊक दर गुणवत्तानुसार 11,000 ते 18,500 प्रति क्विंटल (म्हणजेच 110 ते 185 प्रति किलो) दरम्यान सुरू

देशात ऊसाचे विक्रमी उत्पादन झाले असले, तरी अतिवृष्टीमुळे ऊस पिकाला लागलेला ‘रेड रॉट’ (तांबेरा) रोग आणि जागतिक बाजारातील तुटवड्यामुळे साखरेचे उत्पादन घटले आहे. तथापि, सरकारने स्पष्ट केले आहे की, साखरेची ही दरवाढ इथेनॉल निर्मितीमुळे झालेली नाही.

कांदा-लसणाची महागाई आणि केंद्र सरकारचे मोठे पावले

लांबलेला पाऊस आणि साठवणूक केलेला कांदा खराब झाल्यामुळे बाजारातील आवक घटली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याच्या सरासरी किमती 59 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली आहेत.

महाराष्ट्रातील नाशिक येथून प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेद्वारे विशेष ‘कांदा एक्सप्रेस’ चालवली जात आहे. तसेच, नाफेड आणि NCCF च्या माध्यमातून ग्राहकांना 35 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने कांदा विकण्याची घोषणा करण्यात आली आहे.

सरकारच्या या कडक निर्णयांनंतर घाऊक बाजारात साखरेचे वाढते भाव काहीसे नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली असून, पुढील आठवड्याभरात किरकोळ बाजारातही याचे सकारात्मक परिणाम दिसतील आणि ग्राहकांना दिलासा मिळेल.

Follow Us