माणिकराव कोकाटे कृषिमंत्रीपदाचा राजीनामा देणार का? सर्वात मोठी अपडेट काय?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोकाटे यांचा राजीनामा मागण्याची मागणी होत असताना, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या बाजूने मत मांडले आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे बोललं जात आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर अजित पवारांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या नाराजीनंतर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाईल असे बोललं जात होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा घेऊ नये. कोकाटे यांचे काम चांगले आहे, त्यांना संधी देऊया, असे मत व्यक्त केले. सध्या माणिकराव कोकाटे हे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित आहेत.
माणिकराव कोकाटे यांच्यावर अजित पवारांची तीव्र नाराजी
गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मुंबईतील मंत्रालयातील अजित पवारांच्या अँटी-चेंबरमध्ये ही भेट झाली. जिथे अजित पवार यांनी कोकाटे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवले.
“कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं. तुमच्या वक्तव्यामुळे सरकारची खूप प्रतिमा मलिन झाली आहे. आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं आहे. पण हा विषय आता पुढे गेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात माझ्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.” अशा शब्दात अजित पवारांनी कोकाटेंना दम दिला. यावर माणिकराव कोकाटे यांनी आपली चूक मान्य करत, यापुढे असे होणार नाही असे स्पष्टीकरण दिले.
माणिकराव कोकाटे कशामुळे वादात अडकले?
अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा कोकाटे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर स्पष्टीकरण देताना कोकाटे यांनी “सरकार भिकारी आहे” असे वादग्रस्त विधान केले होते, ज्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात होती.
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मागणी
या बैठकीपूर्वी, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नये, अशी मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने अजित पवारांची भेट घेतली होती. “कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे उत्तम कृषिमंत्री आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊ नका,” अशी भूमिका या शिष्टमंडळाने मांडली होती. मात्र, अजित पवारांनी “हा विषय आता माझ्या हातात नाही” असे उत्तर दिले होते, ज्यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात असल्याचे बोलले जात होते. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असल्या तरी सूत्रांनुसार त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती आहे. मात्र, त्यांच्या खात्यात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
