
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच आता अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ६८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीने आता हिंसक आणि नाट्यमय वळण घेतले आहे. अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी शहरात दोन मोठ्या घडामोडी घडल्या. एकीकडे राज ठाकरे यांच्या मनसेचे दोन उमेदवार गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरात पळवापळवीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दोन जागा जिंकत विजयी सलामी दिली आहे.
महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच उमेदवारांपासून एबी फॉर्मचे वाटप करण्यापर्यंत सर्वत्र गुप्तता पाळली जात होती. बंडखोरी होऊ नये, उमेदवार नाराज होऊ नये यासाठी पक्षांकडून योग्य ती काळजी घेण्यात येत होती. मात्र आता अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अहिल्यानगरमधील मनसेचे दोन उमेदवार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये मनसेने मोठे आव्हान उभे केले होते. मात्र याच प्रभागातील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग हे दोन उमेदवार कालपासून बेपत्ता आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी आरोप केला आहे की, “आमच्या उमेदवारांवर दबाव टाकला जात आहे. कालपासून त्यांचा फोन लागत नाही आणि कुटुंबाचाही संपर्क तुटला आहे. कुटुंबात सध्या भीतीचे वातावरण आहे. या गायब झालेल्या उमेदवारांपैकी एकाची लढत भाजपच्या उमेदवाराशी होती. तर दुसऱ्याची लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराशी होणार होती. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाची कार्यकर्त्यांसह कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे. मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
एकीकडे विरोधातील उमेदवार गायब असताना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. प्रभाग १४ अ मध्ये प्रकाश भागानगरे यांच्या विजयाचा मार्ग कालच सुकर झाला आहे. त्यांच्या विरोधातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाला होता. आज उर्वरित अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने भागानगरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सकाळी कुमार वाकळे यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने ते देखील विजयी घोषित झाले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगमध्ये २८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. या निवडणुकीसाठी एकूण ४७७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता माघारीनंतर ४४९ शिल्लक उमेदवार आहेत. तर ६८ एकूण जागा आहेत. दरम्यान येत्या काळात अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत आणखी किती उमेदवार मैदानातून बाहेर पडतात आणि गायब झालेल्या मनसे उमेदवारांचा शोध लागतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.