कोणी पक्षादेश मानला, तर कोणाची मैत्रीसाठी माघार, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कुठे काय-काय घडलं?
महापालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. १३ जागांवर बिनविरोध विजय मिळवत महायुतीने मुसंडी मारली आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय नाट्य आणि मोठ्या उलथापालथी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या १५ जानेवारीला महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी मतदान होणार आहे. या मतदानापूर्वीच महायुतीतील भाजप-शिवसेना शिंदे गट यांना बंडखोरी शमवण्यात यश मिळाले असून त्यांनी राज्यात १३ जागांवर बिनविरोध विजय मिळवून विजयाचा गुलाल उधळला आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंतची अर्ज मागे घेण्याची मुदत संपणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
कल्याण डोंबिवली निवडणुकीत महायुतीने मतदानापूर्वीच मोठी आघाडी घेतली आहे. १२२ जागांच्या या महानगरपालिकेत तब्बल ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. रेखा चौधरी (प्रभाग १८-अ), आसावरी नवरे (प्रभाग २६-क), रंजना पेणकर, मंदा पाटील आणि ज्योती पवन पाटील (प्रभाग २४-ब) यांनी विजय मिळवला आहे. तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नियोजनामुळे प्रभाग २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी आणि प्रभाग २८-अ मधून हर्षल राजेश यांची बिनविरोध निवड झाली आहे. या विजयामुळे महायुती बहुमताच्या आकड्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे.
धुळ्यात विजयाचे खाते उघडले
धुळ्यात आज सकाळपासूनच राजकीय वातावरण तापले होते. पालकमंत्री जयकुमार रावल आणि शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पक्षाच्या कार्यालयातच तळ ठोकला होता. भाजपच्या प्रभावी रणनीतीमुळे प्रभाग २१ मधून सानिका श्याम मोरे आणि प्रभाग २३ मधून ठाकरे गटाचे संजय मांजरे यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपच्या सुरेखा उगाळे या बिनविरोध निवडून आल्या असून, पक्षाने धुळ्यात विजयाचे खाते उघडले आहे.
पक्षाचा एबी फॉर्म नाही
जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे महानगराध्यक्ष संतोष पाटील यांनी घेतलेली माघार आजच्या दिवसातील सर्वात मोठी घडामोड ठरली. महायुतीत ही जागा भाजपला सुटल्याने त्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नव्हता. मला उमेदवारी न मिळाल्याचे कार्यकर्त्यांना दुःख आहे, पण पक्षाच्या नेत्यांच्या आदेशानुसार मी माघार घेत आहे असे स्पष्टीकरण संतोष पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत दिले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजप नेत्यांनी थेट उमेदवारांच्या घराचा उंबरठा ओलांडला. माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार भागवत कराड स्वतः भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता जाधव यांच्या घरी पोहोचले आणि त्यांची मनधरणी केली. एमआयएमने आपली अंतिम यादी जाहीर करत १४ प्रभागांत ५१ उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक प्रस्थापित नगरसेवकांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
तर सोलापूर महानगरपालिकेत राज्यातील सर्वाधिक १२३० अर्ज दाखल झाले होते. आज दुपारी ३ वाजेपर्यंतच्या माघारीनंतर आता कोणाचे अर्ज शिल्लक आहेत, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. येथे काँग्रेसने २० उमेदवारांची पहिली यादी आधीच जाहीर केली असून, आता खऱ्या अर्थाने बहुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत.
