
महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. त्यातच आता अहिल्यानगरमध्ये सत्ता मिळवण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महापालिकेच्या या लढाईत प्रत्येक प्रभाग जिंकण्यासाठी व्यूहरचना आखली जात असतानाच अहिल्यानगरमध्ये शिवसेनेने एकनाथ शिंदे गटाने मोठी राजकीय खेळी खेळली आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आता मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५ उमेदवारांना दिलेले एबी फॉर्म तांत्रिक कारणास्तव बाद झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र आता शिवसेनेने रणनीती बदलत या ५ जणांसह अन्य ५ अशा एकूण १० अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत जाहीर केले आहे. यामुळे अपक्ष म्हणून लढणाऱ्या या उमेदवारांची ताकद वाढली असून या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून एकूण ५४ उमेदवारांच्या अर्जासोबत एबी फॉर्म जोडण्यात आले होते. मात्र, छाननी दरम्यान त्यातील ५ उमेदवारांचे फॉर्म बाद ठरवण्यात आले. यामुळे हे उमेदवार अधिकृत पक्ष चिन्हापासून वंचित राहिले. त्यामुळे आता पक्षाने या पाचही उमेदवारांना आणि अन्य पाच समर्थकांना अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला आहे.
एकीकडे अपक्षांना पाठिंबा दिला जात असतानाच दुसरीकडे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारालाही जोरदार सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसेनेचे उमेदवार संजय शेंडगे, सचिन शिंदे, रुपाली दातरंगे आणि वैशाली नळकांडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी शिवसेनेचा नक्की विजय होईल, असा १०० टक्के विश्वास व्यक्त केला. तसेच लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी जाहीर सभा अहिल्यानगर शहरात होणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. यामुळे आता अहिल्यानगरच्या राजकीय मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि विरोधक यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.