फेसबुकवरील जाहिरात पाहून भुलला, लाखाच्या बदल्यात मिळाल्या 7 लाखांच्या खेळण्यातील नोटा
अहमदाबादमधील एका टेलरला ७ लाख रुपये मिळण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. फेसबुकवरून जाहिरात पाहून टेलर भुसावळला आला, जिथे त्याला मुक्ताईनगरला बोलावण्यात आले.

अहमदाबादमधील टेलरला 1 लाखाच्या बदल्यात 7 लाख रुपये देतो, असे सांगत आमिष दाखवण्यात आले. जास्त पैशाचे आमिष दाखवत मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथे बोलावून त्याला लुबाडण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. नदीम अब्दुल सलाम सैफी असे फसवणूक झालेल्या टेलरचे नाव आहे. त्याला 7 लाखांच्या लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा दाखवून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीम अब्दुल सलाम सैफी हे मूळचे उत्तरप्रदेशातील हमीरपूर या ठिकाणी राहणारे आहेत. ते व्यवसायाने टेलर आहेत. काही दिवसांपूर्वी फेसबुक पाहत असताना त्यांना एक जाहिरात दिसली. यात 1 लाख रुपयांच्या मोबदल्यात 7 लाख रुपये मिळतील, असे जाहिरातीवर लिहिण्यात आले होते. ही जाहिरात पाहून ते भुलले. या जाहिरातीवर असलेल्या ७९७२४०३८७३ या क्रमांकावर संपर्क साधल्यावर संशयित मनजीतसिंग याने उचलला. त्याने या जाहिरातीची पुष्टी करीत यासाठी मुक्ताईनगरला यावे लागेल, असे सांगितले.
तुम्ही कुरिअरने नोटा पाठवाव्यात, असे नदीम सैफी यांना सांगण्यात आले. मात्र नदीम यांनी असे करण्यास मनाई केली. यानंतर शुक्रवारी १४ मार्च रोजी संशयिताने पुन्हा त्यांना संपर्क केला. यानंतर शनिवारी १५ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता नदीम हे रेल्वेने भुसावळात आले. भुसावळमध्ये आल्यानंतर नदीम सैफ हे बसने मुक्ताईनगरला आले. यानंतर संशयित आरोपींनी त्यांना घेण्यासाठी रिक्षा पाठवली आणि धामणगाव येथे आणले. यावेळी 1 लाख रुपये दिल्यानंतर त्यांना पाचशे रुपयांच्या चलनी नोटांचे प्लॅस्टिक पिशवीत ठेवलेले 14 बंडल देण्यात आले.
लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा पाहून धक्का बसला
त्यानंतर नदीम हे भुसावळात मुक्कामी थांबलेल्या सायली हॉटेलमध्ये आले. त्यांनी रात्री या नोटांचे बंडल उघडून पाहिले. मात्र या बंडलच्या पहिली आणि शेवटची नोट फक्त पाचशे रुपयांची होती. आतील सर्व नोटांवर ‘भारतीय बच्चों का बैंक’ असे लिहिले होते. या सर्व नोटा लहान मुलांच्या खेळण्यातील असल्याने नदीम यांना मोठा धक्का बसला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेचच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी संशयित आरोपी मनजितसिंग उर्फ गोकुळ दशरथ पवार, अविनाश रुबासन पवार आणि एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिसांनी मुक्ताईनगर पोलिसांची मदत घेत संशयित आरोपी मनजितसिंग उर्फ गोकुळ दशरथ पवार, अविनाश पवार यांना अटक केली आहे. या दोघांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
