
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच काँग्रेसचा तरूण चेहरा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी हे अजित पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जात आहे. कारण राष्ट्रवादीच्या ‘जनसन्मान यात्रे’त झिशान सिद्दिकी सहभागी होणार असल्याची माहिती आहे. ‘जनसन्मान यात्रे’मध्ये शेकडो तरूणांना घेऊन झिशान सिद्दिकी बाईक रॅली करणार असल्याचं कळतंय. त्यामुळे झिशान यांच्या अजित पवार गटातील पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसतं. यावर माजी मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे.
आम्हाला काही गोष्टी यापूर्वीच माहीत होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत कोणी सोडून गेलं तर त्याचा फायदाच झाला. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडला तर त्याचा आम्हाला फायदा होतो असा आमचा अनुभव आहे. नांदेडचे बडे नेते भाजपत गेले. मात्र सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे हे दिसून आलं. नांदेडची जागा आम्ही जिंकली. काँग्रेस हा एक विचार म्हणून असलेला पक्ष त्यामुळे कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही. कोणी सोडून गेलं तर आम्ही त्या ठिकाणी जोमाने उभे राहतो, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यावरही बाळासाहेब थोरातांनी भाष्य केलं. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. मात्र ती सुद्धा कोणाच्या प्रभावात जाणं हे देशाच्या हिताचं नाही. आधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेतल्या नाहीत आता विधानसभा सुद्धा लांबणीवर जाते. टी. एन. शेषन यांच्या काळात सत्ताधारी देखील घाबरत होते. मात्र आता सगळं उलट सुरू आहे. निवडणुका पुढे ढकलून सरकारी खर्चातून राजकीय प्रचार सध्या सुरू आहे. मात्र महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. जनतेला हे आवडणार नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
आज रक्षाबंधनचा सण आहे. त्यावरही बाळासाहेब थोरातांनी भाष्य केलं. प्रेमाचा बंधुत्वाचा संदेश देणारा हा सण आहे. कोणत्याही स्वार्थासाठी नसलेलं हे प्रेम असणारा हा सण आहे. गेल्या पाच वर्षातील राजकारण पाहिलं तर राजकारण कसं नसावं यावर लिहिणं गरजेचं आहे.
राजकारणातले विरोधक असावे मात्र ते व्यक्तिगत नसावेत असं राजकारण हवं, असं थोरातांनी म्हटलं आहे.