महाविकास आघाडीचं जागावाटप कधी?; काँग्रेसच्या बड्या नेत्याने तारीख सांगितली
Ramesh Chennithala on Vidhansabha Election 2024 and Mahavikas Aghadi : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काय म्हटलंय? वाचा सविस्तर....
राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चा होतेय ती विधानसभा निवडणुकीची… विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा लढणार? महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाची सध्या चर्चा होतेय. अशातच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला आज शिर्डीमध्ये होते. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चेन्निथला यांनी साईबाबाचं दर्शन घेतलं. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनावे यासाठी बाबांना साकडं त्यांनी घातलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती. चेन्निथला यांनी यावेळी माध्यमांशीही त्यांनी बातचित केली. आगामी निवडणुकीवर ते बोलले.
जागावाटप कधी?
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होणार आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा जागा वाटपावर अद्याप चर्चा झालेली नाही. 7 तारखेला मविआची बैठक होणार आहे. या बैठकीत जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात होईल. राज्यात 288 जागांवर काँग्रेस मजबूत आहे. मात्र आम्ही महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन पुढे जाणार आहोत, असं रमेश चेन्निथला म्हणालेत.
काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. त्याची पडताळणी केल्यानंतर उमेदवार ठरवले जातील. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री निवडणुकीनंतर ठरवला जाईल. आता आम्ही एकजूट होऊन काम करणार आहोत. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून ओढाताण होणार नाही. मुंबईतील जागांबाबत कोणतेही वाद नाहीत, असंही चेन्निथला यांनी म्हटलंय. उद्या उध्दव ठाकरे आणि माझी दिल्लीत भेट होणार आहे. मात्र जागा वाटप दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल. त्यामुळे उद्या जागा वाटपावर चर्चा होणार नाही, असं ते म्हणाले.
घरवापसीवर काय म्हणाले?
मधल्या काळात अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या घरवापसीवरही चेन्निथला यांनी भाष्य केलं. काँग्रेस सोडून गेलले घर वापसी करणार असतील तर त्याबद्दल काँग्रेस कमिटी निर्णय घेईल. मात्र जिल्हा कार्यकारिणीला विचारल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. बाळासाहेब थोरात चांगले आणि प्रामाणिक नेते आहेत. कुणाला काय जबाबदारी द्यायची हे पक्ष ठरवेल, असं म्हणत बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री असतील का? या प्रश्नावर चेन्नीथला यांनी प्रतिक्रिया दिली.