Asaduddin Owaisi : एकदिवस हिजाब घालणारी मुलगी…असदुद्दीन ओवैसी यांचं महाराष्ट्रात येऊन मोठं वक्तव्य
Asaduddin Owaisi : सध्या महाराष्ट्रातील महानगर पालिका निवडणुकीसाठी प्रचार सुरु आहे. AIMIM चीफ असदुद्दीन ओवैसी सुद्धा आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आले आहेत. सोलापुरात त्यांची एक जनसभा झाली. त्यावेळी त्यांनी एक मोठ स्टेटमेंट केलं. त्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रातील महानगर पालिका निवडणुकीसाठी प्रचाराने वेग पकडला आहे. राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करत आहेत, आश्वासनं देत आहेत. शुक्रवारी सोलापुरात प्रचाराच्यावेळी AIMIM चीफ असदुद्दीन ओवैसीनी एक मोठं वक्तव्य केलं. ‘एकदिवस असा येईल हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल’ असं ओवैसी म्हणाले. ओवैसींनी पाकिस्तानच्या संविधानाचा उल्लेखही प्रचारात केला. “एकाच समाजाचा व्यक्ती देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती बनेल असं पाकिस्तानच्या संविधानात लिहिलं आहे. पण भारताच्या संविधानात सर्व समाजाच्या लोकांचं एकच स्थान आहे. आपण तेव्हा नसू, पण एकदिवस असा येईल, जेव्हा हिजाब घालणारी मुलगी भारताची पीएम बनेल” असं असदुद्दीन ओवैसी बोलले.
“लक्षात ठेवा मुस्लिमांबद्दल तुम्ही हा जो द्वेष पसरवताय, तो जास्त काळ टिकणार नाही. द्वेष पसरवणारे संपून जातील. आज तुम्ही बघा, सोलापूरमध्ये 104 रुपयात एक लिटर पेट्रोल मिळतं. पेट्रोलचे कोणी रेट विचारले, तर त्याला बांग्लादेशी ठरवलं जातं” अशा शब्दात विरोधकांवर हल्लाबोल केला. “सोलापुरात इतके मुद्दे आहेत, इतक्या समस्या आहेत. पण सत्ताधाऱ्यांना त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. भाजप, शिंदे आणि अजित पवार तिघांचा महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. मी तुम्हाला आवाहन करतो, या 15 तारखेला तुम्ही त्यांना संदेशा द्या, तुमच्या कारस्थानाला आम्ही बळी पडणार नाही” असं ओवैसी म्हणाले.
संविधानानुसार राजकारण करत नाहीयत
“फडणवीस, शिंदे आणि पवार हे भारताच्या संविधानानुसार राजकारण करत नाहीयत. द्वेषाच्या बळावर हुकूमशाही करतायत. हे अल्पसंख्यांक समाजाचे मित्र नाही, त्यांना कमजोर करायचा इरादा ठेवतात. यांना दलितांना त्यांचा हक्का द्यायचा नाहीय. त्यांना हक्कापासून वंचित ठेवायचं आहे. यांना शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही. तुम्ही पाहू शकता किती आत्महत्या होतायत ते” अशा शब्दात ओवैसी यांनी महायुतीवर टीका केली.
