बिहारी, मुस्लिम मतांवर एमआयएमचा डोळा; पालिका निवडणुकीच्या जुगाडासाठी बिहारचे पाच आमदार मुंबईत

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हातपाय मारायला सुरुवात केली आहे. (aimim's five mla in mumbai for bmc elections)

  • गोविन्द ठाकूर, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 15:25 PM, 24 Jan 2021
बिहारी, मुस्लिम मतांवर एमआयएमचा डोळा; पालिका निवडणुकीच्या जुगाडासाठी बिहारचे पाच आमदार मुंबईत

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हातपाय मारायला सुरुवात केली आहे. त्यात एमआयएमही मागे असल्याचं दिसत नाही. एमआयएमनेही मुंबईतील मुस्लिम आणि बिहारी मतांचा जुगाड करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी एमआयएमचे बिहारमधील पाच आमदार मुंबईत आले असून बिहारी आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (aimim’s five mla in mumbai for bmc elections)

बिहारमध्ये मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे एमआयएमचा हुरुप वाढला आहे. त्यामुळेच एमआयएमने आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेत जास्तीत जास्त बळ निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी बिहारमधील पाच आमदारांना एमआयएमने मुंबईत धाडले आहे. एमआयएमच्या या पाचही आमदारांनी मुंबईतील बिहारी आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन प्रचाराचा धडाका लावला आहे. मुंबईत बिहारमधील नागरिकांची मोठी संख्या आहे. अनेक मतदारसंघात बिहारी मते निर्णायक आहेत. शिवाय बिहारमधील एकाही प्रादेशिक पक्षाचं मुंबईत अस्तित्व नाही. त्यामुळे या बिहारी जनतेचा आवाज बनण्याचं काम एमआयएमकडून सुरू झालं आहे. आपणच बिहारी जनतेचे तारणहार असल्याचं दाखवून बिहारी मते आपल्याकडे खेचण्याचा एमआयएमचा प्लॅन आहे. त्यासाठी बिहारचे हे पाचही आमदार बिहारी वस्त्यांमध्ये खास बिहारी शैलीत भाषण करून बिहारी मतदारांना एमआयएमकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मुस्लिम मतदारही मुंबईत मोठ्या प्रमाणावर आहेत. मुस्लिम मतदारही अनेक ठिकाणी निर्णायक असून अनेक मतदारसंघात मुस्लिम उमेदवारच निवडून येत असतो. त्यामुळे या वॉर्डांवर एमआयएमने लक्ष केंद्रीत केलं आहे. महापालिका निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. मात्र, त्याआधीच एमआयएमने कामाला सुरुवात केली आहे. योग्य नियोजन आणि मोर्चेबांधणी करून बिहारप्रमाणेच मुंबईतही यश संपादन करण्यावर एमआयएमचा भर आहे. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने आमची तयारी सुरू असून त्याचा आढावा घेण्यासाठीच आम्ही मुंबईत आलो आहोत, असं एमआयएमचे बिहारचे आमदार अख्तरुल ईमान यांनी सांगितलं. (aimim’s five mla in mumbai for bmc elections)

 

संबंधित बातम्या:

… तर मराठा आरक्षणासाठी उपोषणला बसू; प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

शुक्राचार्यांना बाजूला करा; शरद पवारांनी साधला ‘या’ नेत्यावर निशाणा

‘सगळ्यांच्या मनातून कोरोनाची भीती जात नाही तोपर्यंत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईनच’

(aimim’s five mla in mumbai for bmc elections)