
राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात पवार कुटुंबाचं नाव, दबदबा फार मोठा आहे. याच पवार कुटुंबात सध्या लगीनसराईचा मौसम आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचे नातू, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचं थाटामाटात लग्न झालं. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथे हा विवाह झाला. या सोहळ्यासाठी पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. तर आता त्यांच्या दुसऱ्या नातवाचा विवाह आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे लाडके चिरंजीव जय पवार हे लग्नबंधनात अडकणार आहेत. ऋतुजा पाटील हिच्याशी त्यांचं लग्न होणार आहे. 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत बहरीन येथे हा विवाह सोहळा होत असून इतर समारंभही होत आहे.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या सुपुत्राचा हा शाही विवाहसोहळा असून त्यातील वरातीचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या वरातीमध्ये पवार कुटुंबातील अनेक सदस्य दिसत असून दस्तुरखुद्द अजित पवार हेही लाडक्या लेकाच्या लग्नाच्या वरातीत मस्त नाचताना दिसत आहेत. सैराट चित्रपटातील प्रसिद्ध अशा झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर अजित दादांनी ठेका धरला असून त्यांची सुहास्य मुद्राही दिसत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
अजितदादांचा भन्नाट डान्स
अजित पवार यांचा मुलगा जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहल सोहळा बहरीनमध्ये पार पडत आहे. काल ( 4 डिसेंबर) मेहंदी सोहळा झाला. तर आज ( 5 डिसेंबर) हळद, मेहंदी आणि मुख्य विवाह सोहळा पार पडत आहे. 7 डिसेंबर रोजी स्वागत समारंभ आणि रिसेप्शन होणार आहे. परदेशात होणाऱ्या या सोहळ्याला पवार कुटुंबातील काही सदस्य गेले, पण अनेक जण अनुपस्थित आहेत. या महत्त्वाच्या सोहळ्याला केवळ मोजक्या 400 पाहुण्यांनाच आमंत्रण देण्यात आलं असून राष्ट्रवादीतून तर फक्त दोनच नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं.
आज विवाह सोहळा पार पडला. राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी लग्नाचे काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. जय पवार यांच्या वरातीचे ते फोटो असून त्यात पवार कुटुंबातील अनेक सदस्य दिसत आहेत. मात्र या सर्वांत लक्ष वेधून घेतलं ते वरपिता, अर्थात अजित पवार यांच्या डान्सने… झिंगाट गाण्यावर त्यांनी ठेका धरल्याचा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी शेअर केला असून त्यात अजित पवार हे हसतमुखाने नृत्य करत असल्याचे दिसले.
तसेच या विविध फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे, मुलगा विजय सुळे, अजित पवार, आमदार रोहित पवार आणि संपूर्ण कुटुंब हेही असून काहीजण वरातीत डान्स करतानाही दिसत आहेत. तसेच नुकतंच लग्न झालेलं जोडपं, युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी हेही यांची झलक त्यात दिसली. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत अकांऊटवर शेअर केलेल्या या फोटोंना भरपूर लाईक्स मिळाले असून अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.