
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले. त्यांच्यासह या अपघातात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्तांमध्ये अजित पवार यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि पायलट यांचा समावेश आहे. या अपघातानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. बारामतीत दादांच्या चाहत्यांचा जनसागर उसळला आहे. बारामतीचे सर्व रस्ते फुल झाले आहेत. आज सायंकाळी रुग्णालयातून विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्य दर्शनासाठी आणण्यात आले होते. यावेळी संपूर्ण कुटुंबासह राज्यभरातून आलेल्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर आता पुन्हा एकदा अजित दादांचे पार्थिव रूग्णालयात आणण्यात आले आहे.
अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि पार्थ पवार यांनी अजित दादांचे पार्थिव पुन्हा रुग्णालयात नेले जाणार असल्याची माहिती दिली. यावेळी जय पवारांच्या डोळ्यात पाणी आले होते. जय पवार यांनी म्हटले की, मी आपल्या सर्वांच आभार मानतो. तुम्ही सर्वांना कायम दादांबद्दल प्रेम दाखवलं आहे, ते आज मला दिसून येत आहे. दादा आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये आहेत. आपल्याला त्यांच्यासाठी भविष्यात ते जसे आजपर्यंत लढत आलेत तसं लढायचं आहे. उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही पुन्हा इथे या असं म्हणताच जय पवार यांच्या डोळ्यात पाणी आले.
अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी म्हटले की, ‘उद्या पुन्हा आपण सर्वजण इथे 10 वाजता जमणार आहोत. सर्वांनी शांतता राखावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. शिस्तीत इथून बाहेर पडा. आम्ही सगळे इथे परत येणार आहोत. आता दादांचे पार्थिव रुग्णालयात नेले जाणार आहे. आम्हाला तुमचं सहकार्य हवं आहे. सर्वांनी एकमेकांना सहकार्य करा, चेंगराचेंगरी करू नका, महिलांना ढकलू नका.’
दरम्यान, आता उद्या सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी आज बारामतीत अजित पवार यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. राज्यात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.