बैलाला साखळी घालतो तसं… सोन्याची चैन घालून मिरवणाऱ्यांना अजित दादांचा टोला

आज अजित पवारांच्या हस्ते पुण्यातील चाकण येथे रांका ज्वेलर्सच्या दालनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी अजित पवार यांनी सोन्याची चैन गळ्यात घालून फिरणाऱ्यांना टोला लगावला आहे.

बैलाला साखळी घालतो तसं... सोन्याची चैन घालून मिरवणाऱ्यांना अजित दादांचा टोला
Ajit Pawar Gold
| Updated on: Sep 29, 2025 | 7:56 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या मिश्किल वक्तव्यासाठी ओळखले जातात. आज अजित पवारांच्या हस्ते पुण्यातील चाकण येथे रांका ज्वेलर्सच्या दालनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी अजित पवार यांनी सोन्याची चैन गळ्यात घालून फिरणाऱ्यांना टोला लगावला आहे. सोनं हे पुरुषांना नाही तर स्त्रियांना शोभून दिसतं असं म्हणत अजित पवारांनी सोन्याची चैन घालणाऱ्या पुरूषांची बैलाशी केली आहे. अजित पवार नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, गोल्डन मॅन म्हणून काहींची ओळख आहे. ‘काहींनी तर सोन्याचे कपडे शिवले होते. हे अति होत आहे. माझं पुरुष मंडळींना आणि तरुणांना एकच सांगणं आहे की, सोनं हे आपल्या मातेच्या, पत्नीच्या, बहिणीच्या आणि मुलीच्या अंगावरच शोभून दिसतं. ते पुरुषांच्या अंगावर नाही. त्यामुळे पुरुषांनी नको त्या भानगडीत पडू नका.’

पुढे बोलताना अजित पवारांनी सोनं घालणार्‍या पुरुषांना म्हटले की, ‘उगाचच बैलाच्या गळ्यात जशी साखळी घालतो, तशी सोन्याची साखळ्या घालतात आणि समोर येतात. खर तर हे सगळं ते त्यांच्या पैशाने करतात. मला यावर काही बोलण्याचा अधिकार नाही.’ अजित दादांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.

महाराष्टात पुराचे संकट आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान, अमित शाह यांना विनंती करून मदतीसाठी निवेदन दिलं आहे. विविध डिपार्टमेंटची मदत लागत आहे. अजून काही गोष्टी समोर येतील आणि निर्णय घेतले जातील. दिवाळीपर्यंत मदत करण्याचं आमचं नियोजन आहे. मंत्रिमंडळ बैठकीत उद्या सकारात्मक निर्णय होतील.

अजित पवार यांनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरही भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, ‘यश मिळाल्यानंतर भारतीयांना आनंद वाटतो, पाकिस्तानने ज्या काही कुरघुड्या केल्या, ऑपरेशन सिंदूर नंतर झालं. त्यानंतर खेळायला नको असं काहीचं मत होतं. ज्यांच्या घरातील व्यक्ती गेली, त्यांचं म्हणणं होतं खेळायला नको आणि काहींचं म्हणणं होतं खेळात हे सगळं नको. मात्र आता सामने संपलेले आहेत.’