अजितदादांच्या ज्या विमानाचा अपघात, त्याच विमान कंपनीवर सर्वात मोठी कारवाई; थेट सरकारचा आदेश!

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता DGCA ने VRS कंमनीवर सर्वात मोठी कारवाई केली आहे.

अजितदादांच्या ज्या विमानाचा अपघात, त्याच विमान कंपनीवर सर्वात मोठी कारवाई; थेट सरकारचा आदेश!
| Updated on: Feb 24, 2026 | 9:27 PM

अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातात एकूण 5 जणांना जीव गमवावा लागला होता. मुंबईवरून बारामतीला जात असताना अजित पवारांचे विमान लँडिंगच्या आधी कोसळले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अनेकांनी घातपाताची शक्यता वर्तवली होती. अशातच आता DGCA ने VRS कंमनीवर सर्वात मोठी कारवाई केली आहे. डीजीसीएने लेअरजेट 40-45 मॉडेलच्या 4 विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे.

विमानांच्या उड्डाणांवर बंदी

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएने लेअरजेट 40-45 मॉडेलच्या VT-VRA,VT-VRV, VT-TRI आणि VT-VRV या 4 विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. ऑडिटमध्ये विमानांच्या देखभालीत चुका आणि कमतरता असल्याचे DGCA कडून सांगण्यात आले आहे. तसेच हवाई सुरक्षा नियमांचे पालन होत नाही असं म्हणत कारणे दाखवा नोटीसही व्हिएसआर कंपनीला बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता कंपनीच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ऑडिटमध्ये आढळल्या त्रुटी

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या कंपनीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर कंपनीकडून या कंपनीच्या विमानांचे ऑडिट करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. यात आता अनेक त्रुटी आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डीजीसीएने आता या कंपनीच्या चार मॉडेलच्या उड्डाणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ही या कंपनीवर करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई आहे.

विमान अपघाताच्या चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष

दरम्यान, रोहित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच अनेकांनी या अपघाताच्या तपासावरही शंका उपस्थित केली आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स रिकव्हर करण्यात आला आहे. या बॉक्समधील डेटाचे विश्लेषण केले जात आहे. यातून या विमानाचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला? अपघाताच्या आधी विमानात काही समस्या निर्माण झाली होती का? याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे आता या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.