
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर राजकारण ढवळून निघाले होते. या अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकात दरम्यान सुरु झाल्या होत्या.अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूका लढवल्या होत्या. मात्र, या दोन्ही पक्षांचे मिलन होण्याबद्दल शरद पवार यांच्या पक्षातील नेतेच वक्तव्य करताना दिसत होते. मात्र, काल अजितदादा यांच्या अस्थि विसर्जनानंतर लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होऊन अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी राजी झाल्या. त्यानंतर आज शनिवारी लोकभवनात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याआधी शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अजितदादांच्या अपघाताबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे.
जयंत पाटील यावेळी म्हणाले की पहाटे साडे तीन चारला निघून साडे सातला मी तिथे पोहचलो. अजितदादाही आले. अन्य आमचे नेतेही आले. पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदेही तिथे आले आणि अजितदादाही आले. अजितदादांनी आम्हाला सांगितले होते की बरोबर येताना मी सुनील तटकरेंना बरोबर घेऊन येतो. मात्र काही कारणांनी ते आले नाहीत असे त्यांनी त्यावेळी सांगितले. त्यानंतर तेथे सांगितले आपण लवकरात लवकर हा निर्णय घेऊ. मात्र, निवडणूक आयोगाने नगर पालिकांच्या निवडणूका जाहीर केल्या, त्या संपायच्या आधी महापालिकेच्या निवडणूका जाहीर केल्या, त्या संपायच्या आधी, जिल्हा परिषदेच्या निवडणूका जाहीर केल्या. म्हणजे मर्जरला कुठे संधी मिळू नये अशी त्यावेळी परिस्थिती निर्माण झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील पुढे म्हणाले की मात्र, अजितदादांनी सांगितले की निवडणूका झाल्यानंतर आपण हा निर्णय जाहीर करु.दुसऱ्यांदा १७ तारखेला पवार साहेबांच्या गोविंद बागेतील निवास स्थानी आम्ही सर्व भेटलो. ते म्हणाले की ५ ला निवडणूका आहेत. ७ निकाल लागणार आहेत. ८ ते ९ ला आपण मर्जर करु. परंतू मी सांगितले की मी ८ -९ तारखेला बाहेर आहे. त्यावर अजितदादा म्हणाले की जयंतराव म्हणतात तर १२ ला बैठक ठेवूया.
असा आमचा १२ तारखेचा दिवस ठरला.अजितदादांनी हेही मला सांगितले की कोणा-कोणाशी चर्चा केलेली आहे. नेत्यांची आणि आमदारांशी चर्चा केली आहे. आमदारांची याला संमती आहे हेही अजितदादांनी आम्हाला सांगितले. पवार साहेबांच्या उपस्थितीत दोन्ही पक्ष वेगळे झाले होते, त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र करु आणि पुन्हा महाराष्ट्रात एकदिलाने काम करु असा अजितदादांचा आग्रह होता. दुदैवाने त्यांचा अपघाती निधन झाले,त्यांची अंतिम इच्छा ही होती असे आता म्हणावे लागेल असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. निवडणूकांचा आयोगातील कोणाशी तरी माझे बोलणे झाले होते की आम्हाला मर्जरसाठी चार दिवसांचा वेळ द्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर जि.प. निवडणूका घ्या अशी मागणी केली होती.
जयंत पाटील म्हणाले की अजितदादा म्हणाले होते की चिंता करु नका, माझे ४० मधले ३८ ते ३९ आमदार मी जे बोलेल ते ऐकतील. मी सगळ्याशी बोलणे केल्यानंतर आपण शिक्कामोर्तब करु असे ते म्हणाले. हे माझे पाच महिन्यापूर्वी बोलणे झाले होते. आता १६ तारखेला ते म्हणाले, मी सगळ्यांशी बोललो आहे. आता आपण शिक्कामोर्तब करु असे अजितदादा म्हणाले.
एकत्र आल्यावर सत्तेत ज्यायचे का ? की अलिप्त राहायचे यावर काही चर्चा झाली होती का असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की दादांना जाऊन तिसरा-चौथा दिवस आहे. त्यांचे सुतक आहे. त्यांचे दिवस पूर्ण झाल्याशिवाय काही राजकीय भाष्य करणे योग्य होणार नाही.योग्य वेळी त्यावर मी भाष्य करेल. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी घाई-घाईने झाला याबद्दल विचारले असता अजितदादा म्हणाले की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा पक्षातला अंतर्गत निर्णय आहे. त्यांच्या पक्षातील निर्णयाबद्दल मी बोलणे योग्य नाही.
अजितदादांच्या अपघाताबद्दल विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, आपण तिथल्या सरपंचाचा एक व्हिडीओ पाहिला. विमान तेथे आले त्यावेळी विचित्र आवाज आला आणि विमान घिरट्या घेऊन कोसळल्याचे सरपंच एका व्हिडीओ म्हणाले आहेत. असे कधी झालेले मी कधीही पाहिले नव्हते. विमान धावपट्टीवर आल्यानंतर ते सरळ ग्लायडर होऊन खाली उतरले असते. त्यावेळी कोणते मशिन बंद पडले. इंजिन बंद पडले का ? मी त्यातला तज्ञ्ज नाही. मात्र, आता याचा उलगडा ब्लॅक बॉक्समधून होईल अशी आम्हाला आशा असल्याचे ते म्हणाले.