सुनेत्रा पवार यांचा अखेर शपथविधी, राज ठाकरे यांची मार्मिक पोस्ट चर्चेत
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यात पोकळी तयार झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढे आता नेतृत्व कोण करणार असा पेच निर्माण झाला असतानाच आज अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.यावर आता मनसेचे नेते राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अनाकलनीय अपघातातील चटका लावणाऱ्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व आता कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु असतानाच काल अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री होण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर रात्रीच सुनेत्रा पवार यांनी मुंबई गाठली. यानंतर सकाळी राष्ट्रवादीचे बुजुर्ग नेते शरद पवार यांनी आपल्याला या सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी विषयी काहीच कल्पना नव्हती असे विधान करुन मोठा गोंधळ उडवला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या फळीतील नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी यामागे हात असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. यावर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्मिक भाषेत ट्वीट ( एक्स ) पोस्ट केले आहे.
अजितदादा यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार असा सवाल निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या प्रचारात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मेतकुट जुळले होते. त्यामुळे हे दोन्ही पक्ष आता एकत्र येणार असे बोलले जात होते. मात्र,अजितदादा पवार यांचा बुधवारी २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी मुंबईतून बारामतीला चार्टर विमानाने येत असताना विमान अचानक कोसळून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत अन्य चौघांचाही मृत्यू झाला.
या अपघाती मृत्यूनंतर अजितदादा यांच्या पश्चात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे जाणार अशी चर्चा सुरु असताना अजितदादांच्या अस्थिविसर्जनानंतर काही तासातच सूत्रे फिरुन त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदासाठी राजी झाल्या. त्यानंतर आज शनिवारी सकाळी राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. त्यात गट नेते पदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती होत त्यांना पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही जाहीर करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा लोकभवनात शपथविधी झाला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात विविध प्रक्रीया येत आहेत.
राज यांचा टोला !
राज ठाकरे यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यांनी सोशल साईटवर पोस्ट केली आहे. त्यात राज ठाकरे यांनी लिहीले आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे. त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं मला वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही ! असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
राज ठाकरे यांची ट्वीट ( एक्स ) नेमके काय ?
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी…
— Raj Thackeray (@RajThackeray) January 31, 2026
