AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP Congress Alliance  : अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजपची युती? काँग्रेसने एका वाक्यात दिलं उत्तर; अफवांना पूर्णविराम

BJP Congress Alliance : अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजपची युती? काँग्रेसने एका वाक्यात दिलं उत्तर; अफवांना पूर्णविराम

| Updated on: Jan 07, 2026 | 12:49 PM
Share

अंबरनाथमधील भाजप-काँग्रेस युतीच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. मात्र काँग्रेसने यावर स्पष्टीकरण देत थेट इशारा दिला आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या युती-आघाडी यांचं राजकारण जोरांत सुरू आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर कुठे आणखी काही समीकरणं पहायला मिळाली. मात्र एकमेकांचे विरोधक म्हणून वावरणारे आणि संधी मिळताच एकमेकांवर आगपाखड करणारे भाजप आणि काँग्रेस यांची अंबरनाथमध्ये युती झाल्याची बातमी समोर येताच प्रचंड खळबळ माजली. एकीकडे काँग्रेसमुक्त भारतचा नारा देणाऱ्या भाजपने सत्तेसाठी अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेसशी हातमिळवणी केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि राजकीय वर्तुळात भूकंप झाला. शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याने पक्षाने मूळ विचारधारा सोडल्याची टीकाही करण्यात आली. यानंतर भाजपचे नेते, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस या हे युतीमुळे स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज असल्याचेही वृत्त समोर आले.

याचदरम्यान आता आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. भाजपप्रमाणेच काँग्रेसच्या वरिष्ठांनाही ही युती खपली नसून काँग्रेसतर्फे स्पष्ट उत्तर देऊन याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यात आला आहे.

काँग्रेसचा इशारा काय ?

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया समोर आली असून भाजप-काँग्रेस युतीवर ते स्पष्टच बोलले आहेत. ‘ अंबरनाथमधून अशा बातम्या येत आहेत की, भाजप आणि काँग्रेसची युती होत आहे. सर्वप्रथम मला हे स्पष्ट करायचं आहे की या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. भाजप आणि काँग्रेस हे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. आमची विचारधारा ही संविधानाची आहे. सर्वधर्म समभावाचं आहे. आम्ही जात पात, प्रांत, भाषा हे सगळं सोडून फक्त भारतीयत्व मानणारे आहोत. त्यामुळे अशा परिस्थितीत जर आमचा कोणीही नेता, कार्यकर्ता असं (युती) करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा संदेश वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. त्यामुळे अशी युती करण्याचा कोणी जर विचारही केला किंवा प्रयत्न केले तर त्यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल ‘ असा इशारा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला.

MIM ही भाजपची B  टीम

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या मुद्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. अंबरनाथ मध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक आले आहेत. निवडणूक लढताना भाजपसोबत कुठलाही संबंध नाही. आमच्या नगरसेवकांनी कुणालाही पाठिंबा दिला नाही असं ते म्हणाले.

आमचा भाजपला पाठिंबा नाही. आम्ही भाजप सोबत जाणार नाही असं सांगत पक्षाने काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांकडून स्पष्टीकरण मागितलं आहे, असं सपकाळ यांनी सांगितलं.

अकोटमधील भाजप आणि एमआयएमच्या युतीवरही त्यांनी टीका केली. ” भाजप आणि एमआयएम एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत, हे दिसून आलं. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे’  अशा शब्दांत सपकाळ यांनी टीकास्त्र सोडलं.

 

Published on: Jan 07, 2026 12:28 PM