
राज्यात गेल्या आठवड्यात 29 महापालिकांची निवडणूक झाली. पण सर्वाचं लक्ष होतं ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडेच. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने शानदार विजय मिळवला. यात भाजपला 89 तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागांवर विजय मिळाला. तर त्यांच्याविरोधातनिवडणूक लढवणारे उद्धव व राज ठाकरे यांच्या शिवसेना मनसेला अनुक्रम 65 आणि 6 जागा मिळाल्या. तर इतर आणि अपक्षांचा आकडा 12 इतका आहे. मात्र निवडणुकीनंतर आता मुंबईचा महापौर कोण याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
दरम्यान या निकालानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख, एकनाथ शिंदे यांनी मोठं पाऊल उचलत त्यांच्या सर्व नगरसेवकांना मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये ठेवलं आहे. वांद्रे येथील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये सर्व नगरसेवक असून त्यावरून विरोधकांनी शिंदेंवर जोरदारा निशाणा साधला आहे. मित्रपक्ष आणि महायुतीत असलेल्या भाजपलाही शिंदेंची ही नीती आवडलेली नाही.
त्यातच आता मनसेने अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत शिंदेंवर कडाडून हल्ला चढवला आहे. लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा! ‘जमल्यास’… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा असं अमित ठाकरे यांनी सुनावलं आहे.
अमित ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी…
नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत?
निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत.
याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास? स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केले त्यांचा अपमान नाही का होतं? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण?
या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलं आहे, त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय. लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा! ‘जमल्यास’… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा.