
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत. युती-आघाडीसाठीच्या बैठकांना वेग आला आहे. अशातच आता अमरावतीतून मोठी बातमी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटी दरम्यान शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना आता रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी भाजप आणि शिवसेनेतील युती तुटल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता युतीसाठी पुन्हा बोलणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमरावती महानगर पालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असताना शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना अमरावतीच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अडसूळ यांची भेट घेण्यासाठी भाजपचे आमदार संजय कुटे रुग्णालयात पोहोचले होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, आमदार संजय कुटे आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ यांच्यात निवडणुकीच्या जागावाटपाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढे आणखी काय वाटाघाटी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण याआधी आज दुपारी शिवसेनेने भाजपसमोर काही जागांचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र तो भाजपने अमान्य केल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता पुन्हा जागावाटपाची चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवसेना आणि भाजप वेगळे लढल्यास दोन्ही पक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये युतीची चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
2017 च्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला होता. 45 जागा जिंकत भाजला बहुमत मिळाले होते, त्यामुळे चेतन गावंडे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली होती. 2017 साली काँग्रेसने 15, शिवसेनेने 7, असदुद्दीनं ओवैसी यांच्या एमआयएमने 10, मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीने 5, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानचे 3 जागांवर विजय मिळवला होता. तर आरपीआय आठवले गटाने एका जागेवर आणि अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळवला होता.