
राज्य सरकारनं ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. राज्य सरकारची ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गरीब कुटुंबातील महिलांना आर्थसाह्य व्हाव हा या योजनेचा उद्देश आहे.
मात्र आता या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच इतर खात्याचा निधी देखील लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात येत असल्याचा देखील आरोप होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता अमृता फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण तर आहेच, पण ही योजना बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे, त्या पुण्यात बोलत होत्या.
नेमकं काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
अमृता फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण तर आहेच, मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार आर्थिक ताण सहन करायला तयार आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सध्या दोन्ही ठाकरे बंधुंच्या युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन भाऊ एकत्र आलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे, कोणताही अजेंडा असो किंवा नसो दोन भाऊ एकत्र येणे हे कुटुंबासाठी चांगली गोष्ट आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पुण्यात पण काही समस्या आहेत, काही गोष्टी व्हायला हव्यात. रस्ते छान झाले पाहिजेत, वाहतूक स्मूथ पाहिजे, मेट्रोने खूप फरक पडला आहे. लोकांच्या जीवनात फरक पडणार आहे. पण सामान्य माणूस सुखदायी जीवन जगू शकत नाही तोपर्यंत देवेंद्रजी त्यांच्या पुण्याच्या फेऱ्या कमी करणार नाहीत, मला तर फक्त शहराच्या समस्या कळतात, मी त्या सांगू शकते. भाजपाचं काय हे भाजप वाल्यांना माहिती. मी एक नागरिक आहे आणि नागरिकांप्रमाणे बोलते. देवेंद्र फडणवीस यांचं पुण्यावर लक्ष आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.