ॲक्सिस बँकेबद्दल रणजीत कासलेंचा गंभीर आरोप, अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर
रणजित कासले यांनी अमृता फडणवीस यांच्यावर ॲक्सिस बँकेतून पोलिसांच्या खात्यांसाठी ३०० रुपये प्रति खाते घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून या आरोपांचे खंडन केले आहे.

वादग्रस्त आणि निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटले आहे. या व्हिडीओत रणजित कासले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता या आरोपांवर अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
नेमकं प्रकरण काय?
ॲड. प्रज्ञा पवार या नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरुन वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओत रणजित कासले यांनी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ॲक्सिस बँकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या तिथे चेअरमन की सीईओ म्हणून काम करतात. प्रत्येक कॉन्स्टेबल आणि प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला धमकवलं जातं की त्यांचं अकाऊंट त्याच बँकेत हवं. प्रत्येक अकाऊंटमागे त्यांना ३०० रुपये मिळतात. जर २ लाख पोलीस आणि इतर पोलीस पकडून ३ ते ४ लाख सहज होतात आणि ३०० रुपयाप्रमाणे त्यांना किती मिळत असतील, याचा विचार करा. साधारण १० कोटी त्यांना मिळतात. याबद्दल पुराव्याची गरज नाही. हे संपूर्ण जनतेला समजू शकते. मला याबद्दल खुलासा करायचा होता, असा गंभीर आरोप रणजित कासलेंनी केला आहे.
प्रज्ञा पवार काय म्हणाल्या?
ॲड प्रज्ञा पवार यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत अमृता फडणवीaसांना टॅग करत काही सवाल केले आहेत. देवेंद्र फडणवीस – अमृता फडणवीस – ऍक्सीस बंक – देवेंद्रचा भ्रष्टाचार? अत्यंत गंभीर आरोप! देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यावर गप्प का बसलेत? खुलासा करा. ॲक्सिस बँक, ॲक्सिस बँक सपोर्ट या गंभीर आरोपाचे स्पष्टीकरण तुम्ही देणार का? असा सवाल ॲड प्रज्ञा पवार यांनी केला आहे.
Your secular id @PradnyaPawar121 is promoting this kind of bullshit ? You are accusing me of taking Rs 300 per account from Axis Bank for Police accounts ? Why are you dragging me in your crooked political agendas ? Can @MumbaiPolice @CPMumbaiPolice please look into this ? https://t.co/CIqhriRlkL
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 19, 2025
अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर काय?
यानंतर आता अमृता फडणवीस यांनी रणजित कासले यांच्या गंभीर आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटद्वारे त्यांनी प्रज्ञा पवार यांच्यावर टीका केली आहे. “ॲड प्रज्ञा पवार तुम्ही चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहात? तुम्ही माझ्यावर पोलीसांच्या अकाऊंटसाठी ॲक्सिस बँकेकडून प्रत्येकी ३०० रुपये घेतल्याचा आरोप करत आहात? तुमच्या या खोट्या राजकीय अजेंड्यात मला का ओढत आहात? मुंबई पोलीस कृपया याची दखल घ्यावी?” असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
