सीआयडी कशी चौकशी करते मला चांगलंच माहीत… अनिल देशमुखांची शंका; अजितदादा अपघात प्रकरणाच्या नव्या चौकशीची मागणी
शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी अजित पवार यांना आज श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना या अपघातावर शंका उपस्थित केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. मुंबईहून बारामतीला जाताना त्यांच्या खासगी विमानाचा लँडिंग दरम्यान अपघात झाला. या अपघातामध्ये अजित दादा यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. लँडिगपूर्वी विमान आकाशातच गोल फिरले आणि एका बाजूला झुकले. त्यानंतर विमानाचा ब्लास्ट झाला. लँडिंगनंतरही विमानाचे दोन ब्लास्ट झाले. या अपघातावर अनेकांनी शंका वक्त केली. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी अजित पवार गटाच्या कार्यालयात जाऊन श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, त्यांनी अजित दादांच्या अपघात प्रकरणावर नवी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत यांनी जी अजित दादांच्या अपघात संदर्भात चौकशीची मागणी केली त्याचे मी समर्थन करतो. अनेक ज्येष्ठ नेते या अपघातावर विशेष शंका उपस्थित करत आहेत. काल छगन भुजबळ बोलले. जे कारण व्हिजिबलिटीचं सांगण्यात आलं की कमी होती, पण त्या ठिकाणचे जे व्हिडीओ आले त्यावरून दिसते हे कारण नाही. केंद्रीय मंत्रालयाने सुद्धा व्हिजिबिलिटीचं कारण सांगितलं त्यावर कोणाचा विश्वास बसत नाही त्यामुळे याची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे. सीआयडी, डिजीसीआय चौकशी करतील पण ही चौकशी हायकोर्ट ज्याच्या नियंत्रणाखाली चौकशी झाली तरच सत्य बाहेर येऊ शकते असे अनिल देशमुख म्हणाले.
“सीआयडी काय चौकशी करते हे मला माहित आहे”
पुढे ते म्हणाले, मी गृहमंत्री होतो. सीआयडी काय चौकशी करते हे मला माहित आहे. हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे. संजय राऊत यांनी सुद्धा ती मागणी केली. त्यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे आणि त्या चौकशीत नेमकं काय झालं ते समोर येईल आणि हे सगळं समोर आलं पाहिजे. ज्याप्रमाणे अनेक शंका उपस्थित करतात त्यामुळे मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मला कधी भेटले तर मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही खाजगी विमानामध्ये प्रवास करणारे टाळा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर प्रतिक्रिया
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर देखील अनिल देशमुख यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा करण्याची वेळ नाही. वेळ आली की त्यावर बोलणार. कुठे कुठे मिटिंग झाल्या कोण कोण होत हे सर्व मी सांगणार.’
