मोठी बातमी! अंजली दमानियांना संतोष देशमुखांच्या पोस्टमार्टम रिपोर्टबाबत वेगळाच संशय, केलं मोठं वक्तव्य
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आता अंजली दमानिया यांनी देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे, त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्टवर संशय व्यक्त केला आहे.

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडसह राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, वाल्मिक कराडला देखील मकोका लावण्यात आला आहे, तर या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. दरम्यान आता या प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टम अहवालावरच संशय व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या दमानिया?
अंजली दमानिया यांच्याकडून संतोष देशमुख याच्या शवविच्छेदन अहवालावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल योग्य दिला आहे का? असा प्रश्न दमानियांकडून उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे वाल्मिक कराड प्रकरणात त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि डॉक्टरांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
वाल्मिक कराडवर प्रतिक्रिया
वाल्मिक कराडसंदर्भात अंजली दमानियांकडून मोठा दावा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच मी याबाबत ट्विट केलं होतं. मात्र काल जेव्हा मी त्याचे रिपोर्ट पाहिले त्यामध्ये असं दिसून आलं की, त्याला काहीच झालेलं नाही. तो अगदी ठणठणीत आहे. त्याचे ब्लड रिपोर्ट देखील नॉर्मल आहेत. त्याच्या सिटीस्कॅनमध्ये देखील त्याला कोणताच आजार नसल्याचं समोर आलं आहे. मग फक्त त्याची बडदास्त ठेवण्यासाठी त्याला रुग्णालयात आणण्यात आलं होतं का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात जे हॉस्पिटलचे अधिकारी असतील जे डॉक्टर्स असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
दरम्यान दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा अशीच मागणी केली आहे. डॉक्टरांची चौकशी करा असं त्यांनी म्हटलं आहे.
