
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता पुन्हा एकदा आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे बड्या नेत्यानं तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीला ते हजर होते. मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले मोरे?
अतिशय जड अंतकरणाने पक्ष कठिण परिस्थतीत असताना मला माझ्या उपनेते पदाचा राजीनामा द्यावा लागत असल्याने मनाला यातना होत आहेत. आज दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या पक्षाचे मुखपत्र दै. “सामना” मधून जी शिवसेना पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर झाली, त्या यादीबद्दल मला कुठल्याही प्रकारची माहिती न देता ती यादी जाहीर झाली आहे. मी गेल्या 10 वर्षापैकी पहिले 3 वर्षे बेलापूर विधानसभा मतदार संघाचा संपर्कप्रमुख म्हणून आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख म्हणून काम करत होतो. आपण माझी उपनेतेपदी नियुक्ती करून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची जबाबदारी देवून संघटनात्मक बांधणीसाठी मला प्रोत्साहीत केलेत. या सर्व संघटनात्मक प्रवाहामध्ये मातोश्रीचा निष्ठावंत सैनिक म्हणून मला सदैव त्याचा अभिमान राहील.
मात्र जे काम एकनाथ शिंदे यांनी माझ्या हॉटेलवर छापा टाकून तसेच कुठलेही अनधिकृत बांधकाम नसताना मध्यरात्री ३.३० वाजता महापालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांची टिम येवून हॉटेलवर तोडक कारवाई केली. हा प्रकार तिन वेळा होवूनही पक्षाचा राजीनामा देण्याची मानसिकता माझ्या मनात कधीच झाली नाही. पण ते काम एकनाथ शिंदेंसाठी राजन विचारे यांनी सहज केले. त्यामुळे माझ्या मनामध्ये अतिशय खेद आहे.
म्हणून वंदनीय शिवसेनाप्रमुखांची क्षमा मागून तसेच आपल्या माझ्यावरील विश्वासाबद्दल आपलीही क्षमा मागून जड अंतकरणाने मी माझ्या उपनेते या पदाचा राजीनामा देत आहे, असं विठ्ठल मोरे यांंनी म्हटलं . हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.