Obc reservation : ओबीसींच्या आरक्षणाचा ठाकरे सरकारकडून खेळखंडोबा, आशिष शेलारांची टीका
मागासवर्ग आयोगाला अपेक्षित असलेला सुमारे 465 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही. असा प्रत्येक टप्प्यावर ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा केला, असा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला.

मुंबई : ओबीसी आरक्षणावरून कोर्टानं राज्य सरकारला दणका दिला आहे. त्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीत जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे सरकार कोर्टात कमी पडल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे. तर आरक्षण न मिळण्यामागे भाजप कार्यकर्त्यांचाच हात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. ओसीबी आरक्षणावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवालाय.
ओबीसींच्या आरक्षणाचा ठाकरे सरकारकडून खेळखंडोबा सुरु
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जो ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला, तो त्यानंतर आलेल्या ठाकरे सरकारला टिकवता आला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर सभागृहात सांगितले तातडीने मागासवर्ग आयोग नियुक्त करण्याची गरज आहे, तेव्हाही ठाकरे सरकारने ऐकले नाही. असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. सदनामध्ये आम्ही आमदारांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आयोग नियुक्ती झाली, पण आयोगाची कार्यकक्षाच ठरवण्यात आली नाही. त्यानंतर इंपेरिकल डाटा गोळा करण्यात आला नाही. तर वारंवार केंद्र सरकारकडे जनगणनेतील माहिती मागत बसले. वास्तविक ही माहिती तत्कालीन काँग्रेस सरकारनेच बिनचूक जमा केली नाही. अशी टीकाही शेलार यांनी केली आहे. सदोष माहिती असल्याचे त्याचवेळी स्पष्ट केले आहे. तरीही त्याच माहितीचा आग्रह करुन वेळ काढण्यात आला.
मगावर्ग आयोगाला निधी देण्यात आला नाही
तर मागासवर्ग आयोगाला अपेक्षित असलेला सुमारे 465 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही. असा प्रत्येक टप्प्यावर ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा केला, असा आरोप पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना आमदार आशिष शेलार यांनी केला.
महापौराबद्दल बोललोच नाही त्याचा प्रसार सुरू
महापौरांबद्दल मी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही, ना कोणत्या महिलांबद्दल, माझी संपूर्ण पत्रकार परिषद न पाहताच ज्यांना कुठेच काही मिळत नाही, ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सार्वजनिक आयुष्यात नितिमूल्य आणि नितिमत्ता पाळणारा मी आहे, शिवसेनेसारखा पाखंडी आणि खोटे पसरवणारा नाही. खोटे बोलणे आणि अपप्रचार ही भाजपची भूमिका नाही. जर कुठे तक्रार केली असेल तर त्यातून सत्यच समोर येईल. असंही शेलार म्हणाले आहेत.
