Aurangabad | औरंगाबाद महापालिकेत शिंदे गटात येण्यासाठी अनेक नगरसेवक संपर्कात, माजी महापौर राजेंद्र जंजाळांचं वक्तव्य!
औरंगाबाद महापालिकेत महायुतीच्या चर्चा आहेत. यावर माजी महापौर आणि शिवसेना नेते नंदकुमार घोडेले म्हणाले, राज्यात एकनाथ शिंदे गट हा भाजपची कठपुतळी बनून काम करत आहे. औरंगाबादेत त्यांनी युती केली तरीही फारसे यश मिळणार नाही.

औरंगाबादः आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेत (Aurangabad municipal corporation) एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत मोट बांधायचे निश्चित केले आहे. शिंदे गटातील (Eknath Shinde) शिवसैनिकांच्या मदतीने शिवसेनेच्या अनेक वर्षांपासूनच वर्चस्वाला सुरुंग लावण्याचं भाजपने ठरवलेलं दिसतंय. त्यामुळे आतापासूनच निवडणुकांसाठी पक्ष संघटन वाढवण्याची मोहीम औरंगाबाद शिंदे गटातर्फे हाती घेण्यात आली आहे. राज्यात शिवसेना आणि भाजप युती असताना औरंगाबादचा विकास करायचा असल्यास इथेदेखील महायुतीच विजयी झाली पाहिजे, असं मत शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ (Rajendra Janjal) यांनी व्यक्त केलंय. काही दिवसांपूर्वीच राजेद्र जंजाळ यांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं. आमदार संजय शिरसाट यांच्यासोबत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्काराच्या रॅलीत राजेंद्र जंजाळ गेले होते. ते औरंगाबादेत परत येताच उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना जिल्हाप्रमुख पद दिलं.
काय म्हणाले राजेंद्र जंजाळ?
औरंगाबादेत महायुतीसाठी अनेक नगरसेवक इच्छुक असल्याचं मोठं वक्तव्य माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केलं. ते म्हणाले, ‘ भाजप आणि शिवसेना म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक युती करून लढणार आहोत. दोन्ही मुद्दे एकत्र करून सामोरे जाऊत. जागा वाटपाचे निर्णय वरिष्ठांशी चर्चा करून सोडवण्यात येतील. तशी तयारी शिवसेना म्हणून आमची झालेली आहे. अनेक लोक संपर्क साधत आहेत. ज्यांना शहराच्या विकासाच्या अपेक्षा आहेत. मनपाकडे निधी पुरेसा नाहीये. राज्य शासनाकडूनच निधी घेऊन काम करावं लागेल. राज्य शासन ज्या पद्धतीने एकत्रित काम करेल, त्याच पद्धतीने एकत्रित काम औरंगाबाद महापालिकेत झालं पाहिजे. म्हणून एकत्रित निवडणूक लढवणार आहोत. यासाठी अनेक इच्छुकांचे सतत फोन येत असल्याचंही राजेंद्र जंजाळ यांनी सांगितलं.
नंदकुमार घोडेले काय म्हणाले?
औरंगाबाद महापालिकेत महायुतीच्या चर्चा आहेत. यावर माजी महापौर आणि शिवसेना नेते नंदकुमार घोडेले म्हणाले, राज्यात एकनाथ शिंदे गट हा भाजपची कठपुतळी बनून काम करत आहे. औरंगाबादेत त्यांनी युती केली तरीही फारसे यश मिळणार नाही. शिंदे गटातील लोकांनी बाळासाहेबांचा फोटो न वापरता निवडणुक लढवून दाखवावी. त्यांच्याकडे शिवसेनेचे तीन नगरसेवक वगळता एकही नगरसेवक जाणार नाही. संपूर्ण शिवसेना एकदिलाने ही निवडणूक लढवेल आणि शिवसेनेचाच फगवा औरंगाबाद महापालिकेवर फडकणार, असा विश्वास घोडेले यांनी व्यक्त केला.
