आनंदाचा शिधा एक किलो, घरात माणसं पाच, यांच्या काकांनी तरी खाल्ला होता का?; अजित पवार यांचा हल्ला

| Updated on: Mar 26, 2023 | 2:11 PM

लोकशाही धोक्यात आली आहे. संविधान अडचणीत आलं आहे. राज्य कशा पद्धतीने चाललं यावर चिंतन करण्याची गरज आहे. बेरोजगारी वाढत आहे. महागाई आकाशाला भिडत आहे. गरीब कुटुंब चालवावं कसं? याचं उत्तर दिलं जात नाही, असंही ते म्हणाले.

आनंदाचा शिधा एक किलो, घरात माणसं पाच, यांच्या काकांनी तरी खाल्ला होता का?; अजित पवार यांचा हल्ला
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जालना : राज्य सरकारने गुढी पाडवा ते आंबेडकर जयंतीपर्यंत गरिबांना आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या या योजनेवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. गुढी पाडव्यापासून ते आंबेडकर जयंतीपर्यंत आनंदाचा शिधा देणार आहेत. कसला आनंद? तुम्ही तिथे आनंद घेताय आणि आनंद शिधा… आनंद शिधा.., सुरू केलंय. देतात किती एक किलो. घरात माणसं किती पाच. एक किलो आनंदाचा शिधा यांच्या काकांनी खाल्ला होता का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला. जालन्यातील घनसावंगी येथे तिर्थपुरीमध्ये इथेनॉल प्रकल्पाचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

एक किलो आनंद शिधा दिला. एक किलो तेल, एक किलो साखर, रवा एक किलो आणि डाळ एक किलो. काय चार किलोने होणार माहीत नाही. तुमचं कुटुंब त्यात चालवून दाखवा. एक महिना या आनंदाच्या शिधावर घर चालवून दाखवा. चेष्टा चाललीय… चेष्टा चाललीय… मस्करी चालली आहे. तुम्हीही भारी माणसं आहात, असा उद्वेग अजित पवार यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

म्हणून जाहिरातीवर वरेमाप खर्च

यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या जाहिरात खर्चावरही टीका केली. बारामती तालुक्यातून मी निवडून येतो. मी रोज पेपरला जाहिरात दिली तर लोक म्हणतील हा जाहिरात द्यायला निवडून गेलाय का कामं करायला निवडून गेलाय. सणावारी जाहिरात आली तर समजू शकतो. पण ते दिलं सोडून. नुसत्या जाहिराती देत सुटले आहेत. कारण त्यांना भीती वाटतेय. काही अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. त्यांना मी विचारलं इतक्या जाहिराती का देत आहात. त्यावर ते म्हणाले, नऊ महिन्यांपूर्वी यांचं सरकार आलं. त्यात पदवीधरची निवडणूक लागली. या निवडणुकीत हे पडले. शिवसेनेतून घेतला म्हणून एक कसबासा निवडून आलाय. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले. म्हणून जाहिरातीवर खर्च सुरू आहे, असं पवार म्हणाले.

त्यांना कळून चुकलंय

कसब्यातील जागाही त्यांनी गमावली. 28 वर्ष तिथून भाजपचा उमेदवार निवडून यायचा. तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार आला. चिंचवडला आपले दोन उमेदवार उभे राहिले. तिथे एक उमेदवार राहिला असता तर महाविकास आघाडीचा उमेदवार दहा बारा हजाराने निवडून आला असता. आपण एकत्र सरकार आणणं हे लोकांना मान्य नाही हे त्यांना कळून चुकलं आहे. कशा पद्धतीने हे सरकार आणलं हे तुम्हाला माहीत आहे. फोडाफोडीचं कसं राजकारण झालं हे तुम्ही पाहिलं आहे. तुम्ही ग्रामपंचायत आणि तालुक्याच्या निवडणुकाही पाहिल्या. पण राज्याच्या इतिहासात असं तोडफोड करून सरकार आलं नव्हतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

असं कुठं असतं का?

यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर भाष्य केलं. पक्ष बाळासाहेबांनी काढला. जाताना तो पक्ष त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हातात दिला. आता त्यांच्याकडून पक्षही काढून घेतला आणि चिन्हही काढून घेतलं. दिलं यांना. असं कुठं असतं का? काय करणार निवडणूक आयोगाने सांगितलं. आता जनतेने सांगितलं पाहिजे, असं सांगतानाच येत्या 2 एप्रिलला संभाजीनगरला सभाा होत आहे. शक्य असेल त्यांनी स्वत:च्या खर्चाने या. आम्ही सर्वजण तिथे विचार मांडणार आहोत, असं ते म्हणाले.