रोड सायकलिंग स्पर्धेसाठी साई अंबेची निवड, महाराष्ट्र संघात स्थान मिळवणारा औरंगाबादचा पहिलाच खेळाडू!

रोड सायकलिंग स्पर्धेसाठी साई अंबेची निवड, महाराष्ट्र संघात स्थान मिळवणारा औरंगाबादचा पहिलाच खेळाडू!
महाराष्ट्र रोड सायकलिंग संघात औरंगाबादच्या साई अंबेची निवड

औरंगाबाद: सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत औरंगाबादच्या साई भिकन अंबे (Sai BHikan Ambe) या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. 12 सप्टेंबर रोजी रविवारी ही चाचणी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग (Dhule-Solapur National Highway) येथे घेण्यात आली. या चाचणीत पात्र ठरणारा साई हा औरंगाबादचा पहिला खेळाडू ठरला असून त्याने चाचणीत दुसारा क्रमांक पटकावला. पुण्यातील दोन खेळाडूंची निवड पहिल्या आणि तिसऱ्या स्थानी झाली.

16 वर्षाखालील वयोगटात निवड

या स्पर्धेत 16 वर्षाखालील वयोगटात 14 किमी टाइम ट्रायल सायकलिंग स्पर्धेत औरंगाबादच्या साई अंबेची निवड झाली. साई हा शहरातील भास्कराचार्य प्रतिष्ठान चाटे स्कूलमध्ये दहावीत शिकणारा विद्यार्थी आहे. स्पर्धेतील हे अंतर त्याने 21 मिनिटात 27 सेकंदात पार पाडले आणि स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. पुण्याच्या वीरेंद्र पाटील याने 21 मिनिट 13 सेकंदात प्रथम क्रमांक मिळवला. पुण्याच्या आदिप वाघ याने 21 मिनिट 28 सेकंदात हे अंतर पार करत तृतीय स्थान मिळवले. या वयोगटासाठी आणखी एक निवड चाचणी होईल. त्यानंतर या वयोगटातील एकूण सहा खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघासाठी केली जाईल, असे साईचे प्रशिक्षक व वडील भिकन अंबे यांनी सांगितले. या निवड चाचणीत बाजी मारल्यानंतर साई 26 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे.

वेरुळचा घाट अन् सातारा डोंगरावर सराव

दहावीत असलेला साई सायकलिंगसाठी दररोज 50 किमीचा सराव करतो. आठवड्यातून दोन वेळा सायकलपटूंसोबत वेरुळपर्यंत जातात. तसेच डोंगरावर सायकलिंगचा सराव करण्यासाठी सातारा डोंगरावरही जातात. सहा वर्षाचा असल्यापासून साईने स्केटिंगला सुरुवात केली. स्केटिंगमुळे त्याचे स्नायू बळकट झाले. स्केटिंग आणि सायकलिंगचे डावपेच सारखेच असतात. त्यामुळे पुढे तो सायकिंगमध्येही कुशल झाला, अशी माहिती भिकन अंबे यांनी दिली. आता महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा साईची आहे.

5 लाखांची सेकंड हँड सायकल, हफ्त्यावर घेतली

साई सध्या सरावासाठी वापरत असलेली सायकल ही स्कँनंडेल कंपनीची असून त्यांनी ती 5 लाख रुपयांना खरेदी केली आहे. सायकलची मूळ किंमत आठ लाख रुपये असून सेकंड हँड असल्याने ती या किंमतीत मिळाली. एक वर्ष आधी घेतलेल्या या सायकलचे हफ्ते अजूनही सुरुच आहेत. मात्र साईने स्पर्धेसाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करावेत, हीच त्यांची तळमळ आहे. आपल्या शहरात अजूनही होतकरू खेळाडू असून एवढ्या महागड्या सायकलसाठी दानशुरांनी पुढे येऊन त्यांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी दीड लाखांपासून ते 15 लाख रुपयांपर्यंत सायकलच्या किंमती असतात.

राष्ट्रीय स्पर्धेतही यश कमावणार

महाराष्ट्र रोड सायकलिंग स्पर्धेत निवड झालेला साई अंबे हा पहिलाच औरंगाबादचा विद्यार्थी आहे. मेहनत आणि जिंकण्याच्या जिद्दीच्या आधारे तो राष्ट्रीय स्पर्धेतही चांगली कामगिरी करेल, अशी आशा सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे संघटक सचिव प्रताप जाधव व सचिव संजय साठे तसेच प्रशिक्षक बिरू भोजने यांनी व्यक्त केली. (Aurangabad cycle player selected for Maharashtra cycle team in under 16 Age group)

इतर बातम्या- 

देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या अध्यक्षांची बैठक प्रथमच औरंगाबादेत होणार, काय आहे बैठकीचा अजेंडा?

Aurangabad Jobs: ग्रीव्हज कॉटन कंपनी औरंगाबादेत उभारणार इंजिन निर्मितीचे हब, शहरात रोजगार वाढीची संधी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI