मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडमध्ये… थेट फिल्डवर; लातूरमध्ये येताच मोठी घोषणा; शेतकऱ्यांना आता…
मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूरमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. भीषण दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि कर्जमाफीसाठी अतिरिक्त निधी गोळा करत असल्याचे सांगितले.

राज्यात भयंकर दुष्काळाची स्थिती आहे. गेल्या दीड महिन्यापासून पाऊसच कोसळला नसल्याने पिकं करपून गेली आहेत. त्यामुळे पाण्यासह जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. तसेच दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचे सर्वच मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच फिल्डवर उतरले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आज लातूरमध्ये जाऊन शेती नुकसानीची पाहणी करत आहेत. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी दुष्काळ निवारणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये आले आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतला आहे. दुष्काळ निवारणासाठी उपाययोजनांची सुरुवात केली आहे. या गंभीर काळात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठी आहोत. शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. कर्जमाफी सुरू आहे. ती बंद करणार नाही. त्यासाठी अतिरिक्त निधी गोळा करत आहोत. निधी कमी पडणार नाही. पिण्याचे पाणी, जनावराचा चारा याचं नियोजन केलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सांगली, कोल्हापुरातून पाणी आणणणार
वॉटर ग्रीड हा महत्त्वाचा प्रकल्प होता. महाविकास आघाडीने हा प्रकल्प गुंडाळला. केंद्र सरकारने जलजीवनचे पैसे दिले होते. ते वॉटर ग्रीडवर वापरता आले असते. पण वापरले गेले नाही. मात्र आता मराठवाड्यात वॉटर ग्रीड करणं आवश्यक आहे. मात्र, सध्या आमचं प्राधान्य पाणी आणण्यावर आहे. कोल्हापूर आणि सांगलींच पाणी उजनीत आणणार आहोत. तिथून ते मराठवाड्याच्या एका भागात नेणार आहोत. त्यासाठी वर्ल्ड बँकेशी बोलणं झालं आहे. मराठवाडा दुष्काळमुक्तीसाठी डीपीआर डिसेंबरपर्यंयत येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
शनिवारपर्यंत अधिसूचना
दरम्यान, फडणवीस यांनी काल मीडियाशी संवाद साधला होता. यावेळीत्यांनी येत्या शनिवारपर्यंत दुष्काळाची अधिसूचना काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. शेतकऱ्यांना आम्ही आधी मदत करणार आहोत. त्यानंतर आम्ही एनडीआरएफच्या नियमानुसार केंद्राकडून आर्थिक मदत मागणार आहोत. मात्र, शेतकऱ्यांना दिलासा देणं हे आमचं पहिलं प्राधान्य असणार आहे, असं सांगतनाच कर्नाटक सरकारने कोणताही दुष्काळ जाहीर केलेला नाही. त्यांनी काही जिल्ह्यांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.