बिबी का मकबऱ्यासमोर उत्खननात सापडले स्नानगृह, मलब्याखाली आणखीही मध्ययुगातील अवशेष सापडण्याची शक्यता

बिबी का मकबऱ्यासमोर उत्खननात सापडले स्नानगृह, मलब्याखाली आणखीही मध्ययुगातील अवशेष सापडण्याची शक्यता
बिबी का मकबरा परिसरात सापडले मध्ययुगीन काळातील अवशेष

औरंगाबाद: शहरातील ऐतिहासिक बिबी का मकबरा (Bibi ka Maqbara, Auarangabad) परिसरात संरक्षक भिंत बांधण्याचे काम पुरातत्त्व विभागाने (Department of Archeology India) हाती घेतले आहे. त्याअंतर्गत गेल्या काही दिवसांपासून परिसरात खोदकाम सुरु आहे. या खोदकामामात मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह, शौचालयासारखा दगडी, चुन्याचे बांधकाम असलेला पाया, अवशेष आढळले आहेत. परिसरातील उत्खननाचे काम अजूनही सुरुच असून या मलब्याखाली आणखी दडलंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मलब्याचे संपूर्ण उत्खनन झाल्यावर अनेक बाबी स्पष्ट होतील.

उत्खननाची जागा नेमकी कुठे?

बिबी का मकबऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या समोरील उजव्या बाजूच्या उंचवट्यावर हे उत्खनन सुरु आहे. 14 सप्टेंबर रोजी 40 मीटर बाय 40 मीटर परिसरात स्ट्रेंचची आखणी करण्यात आली. त्यानंतर या उत्खननाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून दररोज चार ते दहा जण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खोदकाम करत आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे हे खोदकाम मध्येच थांबवले जातेय. पण आकाश मोकळे झाले की पुन्हा काम सुरु होत आहे. दरम्यान, सध्या दोन स्ट्रेंचमध्ये चार ते सहा फूट खोलपर्यंत उत्खनन करून हा मलबा हटवण्यात आला आहे. त्यात विटा, चुना, दगडी मध्ययुगीन बांधकामाचे अवशेष सापडले आहेत.

संरक्षक भिंत बांधण्यासाठी उत्खनन

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने पर्यटकांना सोयी सुविधांसाठी मकबरा परिसरात संरक्षक भिंत, पार्किंगचा परिसर विकसित करण्यासाठी परवानगी मागितली होती. ही परवानगी मंजूर झाली असून त्यासाठी तीन लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले आहे. या कामाच्या प्रस्तावानुसार परिसरात मकबऱ्याच्या संदर्भात काही अवशेष सापडतात का, यासाठी हे उत्खनन सुरु आहे. उत्खनानत आढळून आलेल्या स्ट्रक्चरचे संवर्धन करून पुढील संरक्षक भिंतीचे काम केले जाणार आहे, असे पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून सांगण्यात आले.

स्ट्रक्चर आणखी वाढल्यास कामाचा वेळ व खर्च वाढेल

उत्खनानाचे काम तीन टप्प्यात होत असते. एस्केव्हेशन, सायंटिफिक क्लिअरन्स, डेब्रीज क्लिअरन्स (मलबा साफ करणे) असे हे तीन टप्पे असतात. मकबरा परीसरात संरक्षक भिंतीसाठी परवानगी मिळाली असून, पुरातत्त्व विभागाच्या वतीने 40 मीटर बाय 40 मीटर मलबा हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत या उत्खननात स्नानगृह, स्वच्छतागृहाचा पाया सापडला आहे. हे स्ट्रक्चर पुढेही सापडत गेले तर उत्खननाच्या कामासाठीचा वेळ आणि खर्चही वाढत जाईल, अशी माहिती औरंगाबादमधील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक, डॉ. मिनल कुमार चावले यांनी दिली.

ताजमहालची प्रतिकृती बिबी का मकबरा

बिबी का मकबऱ्याची निर्मिती मुघल बादशहा औरंगजेबाने सतराव्या शतकाच्या अखेरीस केली होती. इतिहासकारांच्या मते, या मकबऱ्याचे बांधकाम मुघल बादशाह औरंगजेवाचे पुत्र आजम शाह यांनी आई दिलरस बानो बेगम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ केले होते. त्यांना राबिया-उद-दौरानी नावाने ओळखले जात. विशेष म्हणजे ताजमहालच्या धर्तीवर याचे बांधकाम करण्यात आले आहे. मुघल काळात ही वास्तू औरंगाबाद शहराचे मध्यवर्ती ठिकाण होते.

इतर बातम्या- 

शिलालेख सांगतो सांगलीचा इतिहास, पलुस तालुक्यातील अकंलखोपमध्ये 900 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ठेवा

लोकशाहीपासून कोरोनापर्यंत आणि पाकिस्तानपासून अंतराळापर्यंत मोदी-कमला हॅरीस यांच्यात चर्चा, भारतभेटीचंही निमंत्रण

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI