अजून किती विद्यार्थ्यांना आयुष्य संपवावं लागणार? अभिजीत दीपके संतापले; सरकारवर हल्लाबोल
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्याने आयुष्य संपवल्याने खळबळ उडाली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी या घटनेवरून सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांचे अजून किती बळी हवेत? असा संतप्त सवाल अभिजीत दीपके यांनी केला आहे.

आयआयटी मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर कॉकरोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजीत दीपके यांनी ट्विट केलं आहे. दीपके यांनी ट्विटमधून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. दूरदूरच्या आदिवासी विभागातही विद्यार्थी आयुष्य संपवत आहेत. यात आता मुंबईसारख्या मोठ्या शहराचाही समावेश झाला आहे. हे संकट प्रत्येक ठिकाणी आलं आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आता तरी प्राधान्य देणार की नाही? अजून किती विद्यार्थ्यांना आपलं आयुष्य गमवावं लागणार आहे? असा संतप्त सवाल अभिजीत दीपके यांनी केला आहे.
अभिजीत दीपके यांनी हे ट्विट करून थेट राज्य सरकारवरच निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यी आयुष्य संपवत असून सरकारकडून त्यावर काहीच उपयायोजना केल्या जात नसल्याने दीपके यांनी संताप व्यक्त केला आहे. दीपके यांचं ट्विट प्रचंड व्हायरल झालं असून त्यावर प्रतिक्रियाही येत आहेत. या ट्विटनंतर आयआयटी मुंबईकडून खुलासा आला आहे. हा विद्यार्थी दुसऱ्या वर्षाला शिकत असल्याचं समोर आलं आहे. हा विद्यार्थी एनर्जी सायन्स अँड इंजीनिअरिंग विभागात बीटेकचं शिक्षण घेत होता. संस्थेच्या दाव्यानुसार, परीक्षेच्या दिवशी त्याला मोबाईल फोनचा वापर करताना पकडण्यात आलं होतं. विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड करून त्यावरून हा विद्यार्थी उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करत होता.
Students are dying in remote Tribal areas, and they’re dying in a cosmopolitan city like Mumbai too. This crisis cuts across geography.
How many more students have to die before their lives become a priority? https://t.co/mNIsecU0ZC
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) September 19, 2026
आयआयटी मुंबईचं म्हणणं काय?
परीक्षेच्या दिवशी झालेल्या घटनेनंतर या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं. दरम्यान, आयआयटी मुंबईने यावर खुलासा केला आहे. आम्ही विद्यार्थ्याविरोधात कोणतीही कारवाई सुरू केलेली नव्हती. विभागाचे प्रमुख आणि परीक्षेशी संबंधित प्राध्यापकांनी विद्यार्थ्याशी चर्चा केली होती. त्याला समजावण्यात आलं होतं. तसेच त्याच्या करिअरवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्याला समजावून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर हा विद्यार्थी वसतिगृहाच्या खोलीत गेला. तिथे तो मृतावस्थेत आढळला, असं आयआयटीने म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांचे आंदोलन
दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबई कॅम्पसमंध्ये जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात 400 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना चांगली सुविधा देण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सुरू असलेली मिड सेमिस्टर परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. आयआयटी मुंबईने विद्यार्थ्याच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं आहे.
