औरंगााबदेत काही मिनिटांचा बंद, नेते-कार्यकर्ते गेले की शटर पुन्हा उघडे, महाविकास आघाडीचा प्रमुख बाजारपेठेतून मोर्चा

औरंगााबदेत काही मिनिटांचा बंद, नेते-कार्यकर्ते गेले की शटर पुन्हा उघडे,  महाविकास आघाडीचा प्रमुख बाजारपेठेतून मोर्चा
महाविकास आघाडीचा औरंगाबादेतील प्रमुख बाजारपेठेतून मोर्चा काढत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.

औरंगाबाद: लखीमपूर खेरी येथे झालेले शेतकरी हत्येच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) दरम्यान औरंगाबादेत दुपारनंतरही फारसा प्रतिसाद दिसून आला नाही.  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत शहरातील मुख्य बाजारपेठेत मोर्चा काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. नेते-कार्यकर्ते आल्यावर तात्पुरती दुकाने बंद करण्यात आली, मात्र नंतर शहरातील विविध ठिकाणची दुकाने सुरूच असल्याचे दिसून आले.

प्रमुख बाजारपेठेतून महाविकास आघाडीचा मोर्चा

शहरातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वतीने प्रमुख बाजारपेठेतून मोर्चा काढण्यात आला. पैठण गेट ते शहागंज या मुख्य बाजार पेठेतून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यात काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, राष्ट्रवादीचे कैलास पाटील तर शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सिडको, हडको आणि इतर भागातील व्यापाऱ्यांनी मात्र दुकाने सुरु ठेवल्याचे चित्र दिसून आले. तसेच ग्रामीण भागातही महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला.

इतर भागातील दुकाने सताड उघडी

शहरातील ज्या भागात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत आहेत, तेवढ्याच भागात दुकाने बंद ठेवली जात आहे. नेते-कार्यकर्ते गेल्यानंतर मात्र दुकाने पुन्हा सुरु केली जात आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठ वगळता इतर भागातील कपडा, किराणा, सराफा अशी सर्व दुकाने सुरु आहेत. ऐन नवरात्रीच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने बंदचे आवाहन केल्याने व्यापाऱ्यांनी त्याला प्रतिसाद न देण्याचा निर्णय घेतला होता.

औरंगाबाद कृउबा मध्ये रोजसारखीच गर्दी

महाविकास आघाडीने राज्यभरात बंद चे आवाहन केले असतानाही औरंगाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत याला शून्य प्रतिसाद मिळालेला दिसून आला. 11 ऑक्टोबर रोजी सकाळीच नेहमीप्रमाणे बाजार समितीत ग्राहक तसेच खरेदी-विक्रेत्यांची मोठी गर्दी दिसून आली. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी रोजच्या प्रमाणेच दुकाने उघडून आपापले व्यवहार सुरू केले.

कन्नडमध्ये बंदला फारसा प्रतिसाद नाही

कन्नडमध्ये महाराष्ट्र बंदला फारसा प्रतिसाद न मिळाल्याचे चित्र आहे. येथील दुकाने नेहमीप्रमाणेच उघडीच राहिली. महाविकास आघाडीतील पदाधिकारी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत आहेत. मात्र व्यापारी तेवढ्यापुरते काही काळ दुकानाचे शटर बंद करून मोर्चा पुढे सरकल्यावर पुन्हा दुकाने उघडी ठेवत आहेत.

इतर बातम्या – 

हा तर ‘शासकीय इतमामातील’ बंद; आशिष शेलारांची खवचट टीका

एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समूह 15 हजार कोटींचे कर्ज घेण्याची शक्यता, एसबीआयसह परदेशी बँकांशी बोलणी सुरु

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI