अनधिकृत लिंकवर केवायसी अपडेट, दीड लाखांची फसवणूक, औरंगाबाद पोलिसांच्या तत्परतेने अर्ध्या तासात रक्कम परत

अनधिकृत लिंकवर केवायसी अपडेट, दीड लाखांची फसवणूक, औरंगाबाद पोलिसांच्या तत्परतेने अर्ध्या तासात रक्कम परत
व्हॉट्सअॅप हॅकिंग टोळीचा पर्दाफाश

लिंकवर जाऊन माहिती भरल्याने आपली फसवणूक झाल्याचे मुख्याध्यापकांच्या लक्षात आले. मात्र त्या दिवशी रविवार असल्याने बँक बंद होती. अशा वेळी कहाटे यांनी तत्काळ पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Nov 08, 2021 | 11:39 AM

औरंगाबादः होम लोनवर टॉप अप लोन घेताच केवायसी अपडेट करण्याचे आमिष दाखवून मुख्याध्यापकाच्या खात्यातील जवळपास दीड लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा (Cyber Crime) प्रकार औरंगाबादेत घडला. मात्र सदर मुख्याध्यापकाने तत्काळ शहरातील सायबर पोलिसात (Cyber police) धाव घेतल्याने काही तासातच हे पैसे परत मिळाले. त्यामुळे मुख्याध्यापकांना मोठा दिलासा मिळाला. या घटनेनंतर सायबर पोलिसात (Aurangabad police ) तत्काळ तक्रार दाखल करणे किती उपयुक्त ठरू शकते, हे लक्षात येते.

बँक खात्यातील रकमेवर सायबर गुन्हेगारांचे लक्ष

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक राजेंद्र कहाटे यांनी होम लोन घेतले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी होम लोनवर टॉपअप लोन घेतले होते. टॉप अप लोनची मोठी रक्कम त्यांच्या बँक खात्यात येताच त्यांना केवायसी अपडेट करण्याबाबत मेसेज आला. कर्जाची रक्कम इतरत्र पाठवायची असल्याने त्यांना खात्याची क्रेडिट लिमिट वाढवणे गरजेचे वाटले. मेसेजमधील लिंकवर क्लिक करून त्यांनी पुढील माहिती भरली. त्यानंतर काही वेळातच त्यांना त्यांच्या खात्यातून एक लाख 54 हजार 555 रुपये काढून घेतल्याचे लक्षात आले. लिंकवर जाऊन माहिती भरल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र त्या दिवशी रविवार असल्याने बँक बंद होती. अशा वेळी कहाटे यांनी तत्काळ पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

सायबर पोलिसांची कारवाई, अर्ध्या तासात रक्कम परत

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीसांनी हे प्रकरण मोठ्या तत्परतेने हाताळले. तेथील अंमलदार सुशांत शेळके व वैभव वाघचौरे यांनी ही रक्कम ज्या वॉलेटला गेली, त्या वॉलेटच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अर्ध्या तासात एक लाख 45 हजार 662 रुपये रोखले. काही वेळाने ही रक्कम कहाटे यांना परत मिळाली. ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक राहुल चव्हाण, वारे, सविता तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लिंकची खात्री केल्याशिवाय माहिती भरू नका

दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीचे प्रकार वाढत असून नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनोळखी फोन कॉल्स, मेसेज अथवा लिंकवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका, कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनद्वारे विचारत नाही. बँक खात्याविषयी माहिती करिता संबंधित बँकेच्या शाखेत जाऊनच खात्री करावी. नागरिकांसोबत अशी कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास लगेच जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शहर पोलीस दलाच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी केले.

इतर बातम्या-

औरंगाबादः लेबर कॉलनीवासीय रस्त्यावर, जीव मुठीत, घरावर टांगती तलवार… 10.30 वाजता कारवाई होण्याच्या दिल्या होत्या सूचना…

एसटीचा संप सुरुच, शहरातल्या 223 बसफेऱ्या रद्द, औरंगाबादेत सोमवारी ड्युटीवर रुजू होणाऱ्या प्रवाशांची कोंडी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें