मनोज जरांगे यांचं नवं आवाहन… पाच दिवसात गॅलेक्सी हॉस्पिटलला या; नेमकं सूचना काय?
मनोज जरांगे पाटील यांनी गॅलेक्सी हॉस्पिटलमधून मोडी लिपी आणि फारसी जाणकारांना तातडीचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदी शोधण्यास सरकारी समितीला मदत करण्यासाठी येत्या पाच दिवसांत त्यांना भेट देण्याचे आवाहन आहे. हे तज्ज्ञ जुन्या नोंदी शोधण्यात योगदान देतील आणि त्यांना विशेष अधिकार मिळतील.

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठं आवाहन केलं आहे. ज्यांना मोडीलिपीचं ज्ञान आहे, अभ्यास आहे, वाचन आहे आणि नोंदी जुळवता येतात, त्या सर्वांनी येत्या पाच दिवसात छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये यावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. समाजासाठी योगदान देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे फोनची वाट न पाहता तुम्ही तात्काळ या पाच दिवसात रुग्णालयात येऊन मला भेटा. तुम्हाला कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारच्या समितीसोबत काम करायचं आहे, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती आता ठिक आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोडीलिपीच्या अभ्यासकांना रुग्णालयात येण्याचं आवाहन केलं आहे. मोडीलिपी अभ्यासकांनी गॅलेक्सी हॉस्पिटलला यावं. उद्यापासून रविवारपर्यंत सर्वांनी रुग्णालयात यायचं आहे. फोनची वाट पाहू नका. आम्हाला मोडीलिपीचे अभ्यासक कोण आहेत हे माहीत नाही. त्यामुळे तुम्ही 27 सप्टेंबरच्या आत रुग्णालयात येऊन भेटा. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जिथे जिथे मोडी लिपीचे अभ्यासक असतील त्यांनी उद्या परवा, शनिवारी, रविवारी… या पाच सहा दिवसात येऊन मला भेटा. बुधवारपासून रविवारपर्यंत कधीही या. तुम्ही तुमचे योगदान द्या. आपल्याला आपल्या लेकरासाठी काम करायचं आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
इतरांनी गर्दी करू नका
मोडी लिपीच नव्हे फारशीच्या अभ्यासकांनीही रुग्णालयात यायचं आहे. तुमच्या नशिबाने तुम्हाला सेवा करण्याची संधी आली आहे. तुम्हाला विशेष अधिकार दिला जाईल. आपल्याला जुना रेकॉर्ड शोधायचा आहे. हैद्राबाद संस्थानातील जुने बाड शोधायचे आहेत. ही सर्व लिखापढी फारसी आणि मोडीलिपीत आहेत. त्यामुळे या भाषांच्या जाणकारांनी, अभ्यासकांनी येऊन मला भेटावं. मी तुमची नावे सरकारला देणार आहे. तुम्हाला वंशावळ जुळवणं, फारशी आणि मोडीलिपीची माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे अभ्यास असणाऱ्यांनीच या. इतरांनी गर्दी करू नका. तुमचं नाव आणि पत्ता घेऊन मला लवकर सरकारला कळवता येणार आहे, असं जरांगे म्हणाले.
दिल्लीपर्यंत जावं लागेल
ज्यांना मोडीलिपी वाचता येते त्यांनीही यावं. तुम्हाला हैद्राबादच्या गॅझेटपासून सर्व शोधायचं आहे. तुम्हाला रेकॉर्ड शोधण्यासाठी योगदान देता येईल. ज्या ठिकाणी व्यापार होता, जनावरांचे व्यापार होते, ते पुरावे शोधता येणार आहेत. तुरुंगात आणि रुग्णालयात जाऊनही पुरावे शोधता येईल. संभाजीनगरात पुराभिलेख विभागात जाऊन तुम्हाला पुरावे शोधता येणार आहे. पूर्वी देवीची लस दिली जायची, त्याचेही पुरावे शोधावे लागणार आहे. ब्रिटिश कालीन आणि निजामकालिन पुरावे शोधावे लागणार आहे. ग्रंथालयात जाऊनही तुम्हाला पुरावे शोधावे लागणार आहे. दिल्लीपर्यंत तुम्हाला पुरावे शोधण्यासाठी जावे लागणार आहे. तुम्हाला विशेष अधिकार दिला जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
