दुष्काळ जाहीर? सोशल मीडियावर यादी व्हायरल… कृषी मंत्र्यांनी काय सांगितलं?
राज्यात दुष्काळाची गंभीर स्थिती असताना सोशल मीडियावर दुष्काळ जाहीर झाल्याची एक यादी व्हायरल झाली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही यादी पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकार 5 ऑक्टोबरपासून पंचनामे सुरू करणार असून, लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर होईल असे आश्वासन दिले आहे.

अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. खासकरून मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाची दाहकता सर्वाधिक आहे. शेतकरी दुष्काळ जाहीर होण्याची आणि मदतीची आस लावून आहे. मात्र, 5 ऑक्टोबरपासून राज्य सरकार पंचनामे करणार असून त्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दुष्काळाची एक यादी व्हायरल झाली आहे. ही यादी जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली असून ही यादी खोटी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मीडियाशी संवाद साधताना या कथित यादीबाबतचा खुलासा केला आहे. सध्या सोशल मीडियात दुष्काळ जाहीर केल्याची एक यादी व्हायरल झाली आहे. या यादीमधे काही तथ्य नाही. अद्याप दुष्काळ जाहीर करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे. मी पश्चिम विदर्भ, मराठवाड्याचा दौरा केला आहे. दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. पावसामध्ये मोठा खंड पडला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. या अडचणीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचा पाठीशी उभे आहोत, असं भरणे यांनी सांगितलं.
निकषाची वाट न पाहता मदत करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे. त्यामुळे आम्ही एनडीआरएफ निकषाची वाट न पाहता नक्कीच मदत करणार आहोत. सध्या ट्रिगर 1 लागू आहे. ट्रिगर 2 चं तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग याबाबत एक प्रेझेंटेशन देखील देईल. कर्जमाफीबाबत साडे पाच लाख शेतकऱ्यांची यादी पुनः बँकेकडे गेली आहे. बँकांनी खूप चुकीची बाब केली आहे. तत्काळ याद्या दुरुस्त करून त्यांनी पाठवाव्या, असं भरणे म्हणाले. तसेच शेतकऱ्यांचा दांडगा अनुभव असणाऱ्या शरद पवार यांनी ज्या सूचना केल्या आहेत, त्याचं आम्ही नक्की पालन करू, अशी माहितीही त्यांनी दिली.
बँकेकडून कर्जवसुलीच्या नोटिसा
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात एकीकडे दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मोर्चे, आंदोलन आणि रास्ता रोको सुरू असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांना थेट कर्जवसुलीच्या नोटिसा बजावण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तुळजापूर तालुक्यातील पांगरवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी गुंडीपंत मारडकर यांना बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्जवसुलीसंदर्भात अलीकडे तीन नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या नोटिसांमध्ये वकिलांची फी देखील शेतकऱ्याने भरण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एकीकडे पिकांचे नुकसान, पावसाचा मोठा खंड आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात, तर दुसरीकडे कर्जमाफी किंवा मदतीची अपेक्षा असताना कर्जवसुलीच्या नोटिसा हातात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
