जरांगे पाटील यांच्या किती टक्के मागण्या मंजूर? महाजन काय म्हणाले? अंतरवलीत आज काय घडणार?

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. ९० टक्के मागण्या मान्य झाल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले असून, जरांगे पाटलांनी पाणी आणि सलाईन घेण्यास सुरुवात केली आहे, मात्र आंदोलन सुरूच ठेवले आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभर बंद, रास्ता रोको आणि प्रतिकात्मक आंदोलन होत असून, जरांगे पाटलांच्या तब्येतीमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.

जरांगे पाटील यांच्या किती टक्के मागण्या मंजूर? महाजन काय म्हणाले? अंतरवलीत आज काय घडणार?
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 03, 2026 | 10:27 AM

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, काल सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर जरांगे अंशत: समाधानी झाले आहेत. त्यामुळे जरांगे यांनी पाणी घेण्यास आणि सलाईन लावण्यास सुरुवात केली आहे. पाणी घेतलं तरी जरांगेंनी आंदोलन सुरूच ठेवलं आहे. जरांगेंशी काल सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली. यावेळी जरांगे यांच्या किती टक्के मागण्या मान्य झाल्या याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांच्या 90 टक्के मागण्या मान्य झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या ९० टक्के मागण्या पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, अशी आमची कोणतीही भूमिका नाही. उलट 2014मध्ये आम्ही त्यांना आरक्षण दिलं होतं. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे आरक्षण गेलं, असं गिरीश महाजन म्हणाले. आम्ही मराठा समाजाला लाखो प्रमाणपत्र दिली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठवाडा बंद

दरम्यान, मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आज मराठवाड्यात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. काही ठिकाणी हिंसक घटना घडल्याचंही वृत्त आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन मराठा आंदोलकांनी केलं आहे. तिकडे जिंतूर नांदेड महामार्गावर भेंडेगाव शिवारातही रास्ता रोको करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज बीड जिल्हा बंद ठेवण्यात आला आहे. जरांगे यांची प्रकृती खालावल्यानंतर काल जिल्हा बंद ठेवण्याचं आवाहन मराठा बांधवांनी केलं होतं. त्यानुसार बंद पुकारण्यात आला असून जिल्ह्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आमदारांची तिरडी यात्रा

हिंगोलीच्या वसमतमध्ये आज 288 आमदारांची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढण्यात येणार आहे. कुरुंदा येथून ट्रॅक्टर रॅली निघणार असून प्रतिकात्मक तिरडी यात्रेत सहभागी होणार आहे. तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आणि बंदचेही आवाहन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे. मार्केट बंद करण्यात आले आहेत. सेनगाव, आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, जवळा बाजार, गोरेगाव यासह विविध ठिकाणी छोटया मोठ्या बाजार पेठ बंदचे आव्हान करण्यात आले आहे. नागपूरच्या हैदराबाद महामार्गावर घोळवा पाटी शिवारात रास्ता रोको करण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us