औरंगाबादमध्ये प्रशासनाचं मोठं पाऊल, 14 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू

विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने प्रशासनाचे मोठं पाऊल उचललं आहे (Night Curfew declare in Aurangabad due to corona pandemic).

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद
  • Published On - 15:52 PM, 23 Feb 2021
औरंगाबादमध्ये प्रशासनाचं मोठं पाऊल, 14 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू

औरंगाबाद : विदर्भात कोरोनाचा स्फोट झाला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये दररोज शेकडो नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अमरावती आणि अचलपूर शहरात तर भयानक परिस्थिती आहे. अचलपूरमध्ये तर अनेक कुटुंबांना बाधा झाली आहे. त्यामुळे तिथे आठवड्याभरासाठी कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने प्रशासनाने मोठं पाऊल उचललं आहे. प्रशासनाने औरंगाबाद शहरात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे (Night Curfew declare in Aurangabad due to corona pandemic).

औरंगाबादेत रात्री फक्त ‘या’ सुविधा सुरु राहणार

औरंगाबादेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी 14 मार्चपर्यंत असणार आहे. संचारबंदीच्या कालावधीत उद्योग आणि आरोग्य व्यवसाय वगळता बाकी सगळं बंद राहणार आहे. याबाबतचा निर्णय नागपूर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला.

प्रशासनाच्या धडाडीच्या कारवाया आणि निर्णयाची अंमलबजावणी

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या आठवड्यात अनेक धडाडीच्या कारवाया केल्या. तसेच अनेक महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली. यापुढेदेखील अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

विदर्भा पाठोपाठ मराठवाड्यात कोरोनाचा कहर

विदर्भपाठोपाठ मराठवाड्यात कोरोनाचा कहर बघायला मिळतोय. मराठवाड्यात काल (22 फेब्रुवारी) दिवसभरात तब्बल 444 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 132, जालना 137, परभणी 22, हिंगोली 9, नांदेड 59, लातूर 35, उस्मानाबाद 11 आणि बीड जिल्ह्यातीलही काही रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबादमध्ये किती रुग्ण सक्रीय?

औरंगाबादमध्ये काल दिवसभरात 132 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 48770 वर पोहोचला आहे. यापैकी 46574 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1255 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सध्या औरंगाबादेत 941 रुग्णांवर उपचार सुरु आहे (Night Curfew declare in Aurangabad due to corona pandemic).

औरंगाबादच्या खासदारांना कोरोनाची लागण

औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे सरकारमधील अनेक बड्या नेत्यांना कोरोनची लागण झाली आहे. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बच्चू कडू, एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे यांचा समावेश आहे.