औरंगाबादः ओमिक्रॉनचे (Omicron) घोंगावणारे संकट लक्षात घेता, औरंगाबादेतही जिनोम सिक्वेन्सिंगची अद्ययावत लॅब असणे अत्यावश्यक झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आणि प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची ओमिक्रॉनची टेस्टही करणे आवश्यक आहे. कोरोना बाधित व्यक्तीला ओमिक्रॉन या कोरोनाच्या विशिष्ट व्हेरिएंटची बाधा झाली आहे का, हे पाहण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग लॅबद्वारे (Genome sequence lab) चाचणी करण्यात येते. मात्र महाराष्ट्रात फक्त मुंबई आणि पुणे याठिकाणीच जिनोम सिक्वेन्सिंग लॅब आहेत. त्यामुळे या दोन लॅबवरच खूप ताण असल्याने रुग्णांचे अहवाल येण्यासाठी सात दिवस प्रतीक्षा करावी लागते. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरु करण्याचे प्रयत्न जिल्हा आणि राज्य स्तरावरून सुरु आहेत. दरम्यान, अशी अद्ययावत लॅब विद्यापीठात सुरु होईल की घाटी रुग्णालयात यासंबंधीचा निर्णय येत्या तीन दिवसात घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.