VIDEO: तुम्ही असं आजही म्हणता की, तुम्ही जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहात?; पंकजा हसल्या अन् म्हणाल्या…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर पत्रकारांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही तुम्ही असं आजही म्हणता की, तुम्ही जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहात? असा सवाल केला. (Pankaja Munde reaction on her CM ambitions)

VIDEO: तुम्ही असं आजही म्हणता की, तुम्ही जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहात?; पंकजा हसल्या अन् म्हणाल्या...
Pankaja Munde


औरंगाबाद: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर पत्रकारांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही तुम्ही असं आजही म्हणता की, तुम्ही जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहात? असा सवाल केला. त्यावर पंकजा मुंडे यांनी हसून उत्तर दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

औरंगाबादमध्ये ओबीसींच्या विभागीय मेळाव्याला संबोधित केल्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. चांगली गोष्ट आहे. आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. लोकांचं प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, असं पंकजा म्हणाल्या.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे, असं फडणवीस म्हणाल्याचं पंकजा यांना पत्रकारांनी सांगितलं. तुम्ही असं आजही म्हणता की, तुम्ही जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहात? असा सवालही त्यांना केला. त्यावर पंकजा यांनी लगेच त्यावर हसून हरकत घेतली. जनतेच्या मनातला शब्द तुम्ही खेचू शकत नाही, असं त्या म्हणताच एकच खसखस पिकली.

फडणवीस नेमके काय म्हणाले?

दरम्यान, नवी मुंबईतील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं होतं. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे. मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं, असं फडणवीस म्हणाले.

ते मनातून काढून टाका: मलिक

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना फडणवीसांना टोला लगावला. दोन वर्ष फिरत असताना मला असं वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी मुख्यमंत्रीच आहे असं मला वाटतं असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मला वाटतं दोन वर्ष होऊन गेली आहेत. पण ते मुख्यमंत्रीपदाच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत त्यांनी काम केलं पाहिजे. ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी मनातून काढलं पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मोठं आहे. ते पद मुख्यमंत्रीपदापेक्षा कमी नाही हे त्यांना कळलं पाहिजे, असा चिमटा मलिक यांनी काढला आहे.

स्वप्न रंजनातून बाहेर पडा: लोंढे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही फडणवीसांना टोला लगावला. भाजप सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस यांना आजही तेच मुख्यमंत्री असल्याचा भास होत आहे. दोन वर्षापासून फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत हे वास्तव त्यांनी अजूनही स्विकारलेले नाही. पण स्वप्नरंजनातून बाहेर पडून फडणवीस यांनी वास्तव स्विकारले पाहिजे, असा चिमटा अतुल लोंढे यांनी काढला.

फडणवीस यांना सत्तेचा मोह सुटलेला दिसत नाही. सत्ता हातातून जात आहे असे दिसताच त्यांनी पहाटेचा प्रयोग करून पाहिला पण त्यांचे ते मुख्यमंत्रीपद हे औटघटकेचे ठरले. त्यानंतरही सतत ‘मी पुन्हा येईन’ ‘मी पुन्हा येईन’, असा घोषा लावत बसले पण पुन्हा काही संधी मिळाली नाही. मविआचे सरकार आज पडणार, उद्या पडणार, या तारखेला पडणार, चार दिवसानंतर पडणार अशा ज्योतिषाच्या तारखा सांगूनही झाल्या पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही जात नाही उलट ते आजही भक्कम आहे. पण फडणवीसांना मात्र शेखचिल्लीसारखे आजही स्वप्नरंजनातच मग्न होण्यात जास्त रस दिसतो, अशी टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

VIDEO: मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही, देवेंद्र फडणवीस यांची ‘मन की बात’

पंकजा मुंडेंची तोफ भगवान गडावरून धडाडणार; पंकजा यांच्या निशाण्यावर कोण?; भागवत कराड मेळाव्याला उपस्थित राहणार?

अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याची तब्येत बिघडली! राज्य सरकारचं दुर्लक्ष, भाजपचा आरोप

(Pankaja Munde reaction on her CM ambitions)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI