कव्वालीच्या कार्यक्रमात नोटांची उधळण, खासदार जलीलांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे नाहीतर…, मनसेचा इशारा

कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला खरा पण अजूनही खासदार जलीलांवर गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळेच मनसेने आक्रमक होत खासदारांवर गुन्हा दाखल करा नाहीतर रस्त्यावर उतरु, असा इशारा दिला आहे.

कव्वालीच्या कार्यक्रमात नोटांची उधळण, खासदार जलीलांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे नाहीतर..., मनसेचा इशारा
imtiaz jaleel
| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 7:54 AM

औरंगाबाद : कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात औरंगाबाद प्रशासनाच्या निर्णयाला जोरदार विरोध करणारे AIMIMचे खासदार इम्तियाज जलील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कोरोना काळात त्यांनी थेट शासनाच्या नियमावलीलाच हरताळ फासला. खुलताबाद परिसरातील एका कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील सहभागी झाले होते. इतकंच नाही तर जलील यांच्यावर या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पैशांची उधळणही झाली होती. या प्रकारानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला खरा पण अजूनही खासदार जलीलांवर गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळेच मनसेने आक्रमक होत खासदार जलील यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा दिला आहे. (Police Should Action against AIMIM Imtiaz jalil Says MNS Suhas Dasrathe)

मनसे जिल्हाध्यक्षांना इशारा

नियम केवळ सामान्य लोकांनाच लागू नाहीत तर इथल्या मंत्री, आमदार, खासदार अधिकारी वर्गाला देखील लागू आहेत. खासदार इम्तियाज जलील यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करा अन्यथा मनसे रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सुहास दसरथे दिला आहे.

आयोजकांवर गुन्हा दाखल, फार्म हाऊस सील

कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करुन कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माध्यमांनी ही बातमी लावून धरल्यानंतर अखेर पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई केलीय. कोरोना निर्बंधातही कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्या उपस्थितीत फार्म हाऊस सील करण्यात आलंय. या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे व तपासाअंती कार्यक्रमात सहभागी झालेल्यांवरही गुन्हा दाखल केला जाणार आहे.

इम्तियाज जलील यांचा व्हिडीओ व्हायरल

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असं असताना खुलताबाद परिसरात कव्वालीच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कव्वालीच्या या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलीलही सहभागी झाले. त्याचबरोबर जलील जेव्हा व्यासपीठावर गेले तेव्हा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नोटांची उधळणही करण्यात येत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. इम्तियाज जलील यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

(Police Should Action against AIMIM Imtiaz jalil Says MNS Suhas Dasrathe)

हे ही वाचा :

कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण, आयोजकांवर गुन्हा, फार्म हाऊसही सील