राजयोग संपला, 100 नव्हे 500 टक्के मोदींची सत्ता येणार नाही, बड्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'राजयोग' संपल्याचा दावा केला आहे. 2029 पर्यंत मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत, तसेच ते एप्रिल-मेपर्यंत पायउतार होतील असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयाचा दाखला देत, देशात मोठे परिवर्तन अपेक्षित असल्याचे राऊत म्हणाले.

राजयोग संपला, 100 नव्हे 500 टक्के मोदींची सत्ता येणार नाही, बड्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 21, 2026 | 11:01 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा सत्ता येणार नाही. मोदी एप्रिल- मे महिन्यात सत्तेतून पायउतार होतील. त्यांचा राजयोग संपला आहे. देशात 2029मध्ये मोठं परिवर्तन होणार आहे, असा दावाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत आज छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना मोदी सरकारचं भाकीतच वर्तवलं आहे.

संजय राऊत यांना राजस्थानच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत विचारण्यात आलं होतं. यावेळी राऊत यांनी हा मोठा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. राजस्थानच्या 36 पैकी 32 जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसची सरशी झाली आहे. याचा अर्थ देशातील वातावरण झपाट्याने बदलत आहे. राजस्थानसारख्या निवडणुकीतील हे प्रतिबिंब देशभर दिसणार आहे. जनतेचा दबाव निवडणूक यंत्रणेवर आहे. त्यामुळे राजस्थानात त्यांना गडबड, घोटाळे करता आले नाही. म्हणूनच भाजपविरोधातील हा प्रवाह या मतदानात दिसला. हा दबाव कायम राहिला तर 2029मध्ये 100 नव्हे 500 टक्के या देशात मोदींची सत्ता येणार नाही. मोदींचा राजयोग संपलेला आहे. हे मी वारंवार सांगतोय, असं संजय राऊत म्हणाले.

Loading...

2029 पर्यंत पूर्ण परिवर्तन

मोदी आणि शाहांच्या कार्यपद्धतीवर प्रशासनाचा विश्वास नाही. हे राज्य लवकर जावं सर्वांना वाटतं आहे. फक्त ज्ञानेश कुमार यांनाच वाटत असेल मोदींचं राज्य राहावं. पण ज्ञानेशकुमारही जातील. एप्रिल किंवा मेपर्यंत मोदीही जातील. 2029 पर्यंत देशात पूर्ण परिवर्तन झालेलं दिसेल, असा दावा राऊत यांनी केला.

मोदींनाही मान्य

देश आर्थिक अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्याचा कधीही स्फोट होईल, त्याकडे राहुल गांधी वारंवार लक्ष केंद्रीत करत आहेत. मोदींनीही उद्योगपतींसमोर हे मान्य केलं आहे. तुम्हाला सवलती दिल्या, पण नोकऱ्या कुठे आहेत? अशी विचारणा मोदींनी उद्योगपतींना केली आहे. म्हणजे त्यांनी रोजगार देऊ शकलो नसल्याने कबुल केलं आहे. तुम्ही टिपू सुलतान, भारत आणि पाकिस्तान यावर आंदोलनं करता. कधी तरी राष्ट्रीय विचारावर आंदोलनं केली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं.

ओरबाडता आलं नाही

नाशिक महापालिकेत संख्याबळ कमी असतानाही ठाकरे गटाचे दोन नगरसेवक स्विकृत सदस्य झाले आहेत. त्यावरूनही राऊत यांनी भाजपला टोला लगावला. भाजपमध्ये अंतर्गत ज्या घडामोडी असतात त्याची नाशिकमध्ये त्यावर संभाजीनगरला चर्चा करण्याची गरज नाही. तिथे स्विकृत नगरसेवकांची निवड झाली. शिवसेनेचे दोघे स्विकृत नगरसेवक म्हणून नियुक्त झाले. हेमंत गायकवाड आणि बाबा गायकवाड. आमचं संख्याबळ एक जागा निवडून आणण्याचं होतं. पण दोन आल्या. भाजपमध्ये काही गोंधळ झाला असेल. भाजपचं जेवढं संख्याबळ होतं तेवढे त्यांचे स्विकृत नगरसेवक झाले आहेत. त्यांना दुसऱ्याचं बेकायदेशीरपणे ओरबाडता आलं नाही, त्यामुळे गोंधळ उडाला असेल. किंवा त्यांनी जी पाच सहा नावे दिली होती, त्यावर त्यांचे मतभेद असू शकतात. पण हा त्यांचा प्रश्न आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us