औरंगाबाद : दहशतवादी (Terrorist) पकडण्यासाठी पोलिसांनी नुकतेच आभासी प्रात्याक्षिक (Mock Drill) केले. पण या मॉक ड्रिलवर प्रश्न उभा करण्यात आला. या आभासी प्रात्यक्षिकादरम्यान मुस्लिम द्वेष पसरविण्यात आल्याचा आरोप करत थेट न्यायपालिकेचा दरवाजा ठोठाविण्यात आला. पोलिसांच्या भूमिकेविरोधात थेट फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे (Bombay High Court of Aurangabad Bench) न्या. मंगेश पाटील आणि न्या. संतोष चपळगावकर यांनी गृहमंत्रालय, पोलीस महासंचालक व इतर प्रतिवादींना नोटीस बजावली. पुढील सुनावणीपर्यंत विशेष समुदायातील व्यक्तींना दहशतवादी म्हणून कोणत्याही मॉक ड्रिलमध्ये दाखवू नये, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.