औरंगाबादः जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय, मात्र या विषाणूची तीव्रता कमी झालेली दिसून येत आहे. गुरुवारी शहरात कोरोनाचे 111 रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात 17 नव्या रुग्णांची भर पडली. सुदैवाने दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही. आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे रोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरीही फार कमी रुग्णांना रुग्णालयात भरती व्हावे लागत आहे. विशेष म्हणजे शहरात बऱ्या झालेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांनाही ऑक्सिजनची गरज पडली नाही. शहरातील 62.5% रुग्ण हे घरातच विलगीकरणात राहत आहेत. केवळ 37.5 % रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तरीही रुग्णांनी शक्यतो घरीच रहावे, बाहेर फिरू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.