5 ऑक्टोबरपासून पंचनामे… उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांवर संतापले; म्हणाले, कोणता मुहूर्त…
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 5 ऑक्टोबरपासून पंचनामे सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला. '5 ऑक्टोबरला कोणता मुहूर्त आहे?' असा सवाल करत ठाकरेंनी या दिरंगाईवर टीका केली. अल निनोची माहिती असतानाही सरकारने तयारी का केली नाही, तसेच शेतकऱ्यांसाठी मागील योजनांचा लाभ किती पोहोचला, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

येत्या 5 ऑक्टोबरपासून पंचनामे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांच्या या घोषणेवर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. 5 ऑक्टोबरपासून पंचनाम्याची सुरुवात करणार आहात. हा नाकर्तेपणा कुणाचा आहे? माझ्या काळातील तर हा नार्केतपणा नाही ना? असा सवाल करतानाच 5 ऑक्टोबरला पंचनाम्याचा असा कोणत मुहुर्त आहे? असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पंचनाम्यासाठी 5 ऑक्टोबरचा कुठला मुहूर्त काढला आहे? एनडीआरएफची कारणं देत आहेत. मुळात कायदा हा जनतेसाठी असतो, याचं या सरकारला भान नाही का? असा सवाल करतानाच आता चाऱ्याची समस्या निर्माण होणार आहे. त्याचं काय नियोजन आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
अल निनो येणार माहीत नव्हतं का?
मुख्यमंत्री असातना मी शिवभोजन योजना सुरू केली होती. आम्ही कोरोनाच्या संकटात काम केलं होतं. आता तुझं-माझं करण्यापेक्षा आजचं कोण निस्तरणार आहे? हे दुष्टचक्र आहे. शेतकऱ्यांच्या आपत्तीत धावून गेलं पाहिजे. नैसर्गिक आपत्ती आपल्या हातात नसते. आता दुष्काळ दिसत असताना चिंता व्यक्त करत असाल तर राज्यकर्ते म्हणून तुम्हाला याची काही कल्पना नव्हती का? अल निनोचं भाकीत असताना तुम्ही तयारी का केली नाही? असे सवाल करतानाच इतर राज्यात काय केलं ते पाहा, असा हल्लाच त्यांनी चढवला.
अच्छे दिन कधी येणार?
शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आले आहेत. तुम्ही वाद घालणार की काम करणार? अच्छे दिन येणार असं सांगत होतात. ते कधी येणार आहेत? अच्छे दिन येणार हे तर मी कधी बोललो नव्हतो, असा चिमटा काढतानाच आमचे आमदार आणि खासदार लवकरच विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कर्जमाफीने कुणाचा फायदा?
गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी याच मुख्यमंत्र्यांनी इतिहासातील मोठं पॅकेज जाहीर केलं. ते किती लोकांपर्यंत पोहोचलं? साडे तीन रुपये तरी शेतकऱ्यांना मिळाले काय? कर्जमुक्तीचे फक्त आकडे दाखवत आहेत. प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे? माझ्या कर्जमाफीने बँकेचा फायदा झाला म्हणता, मग तुमच्या कर्जमुक्तीने कुणाचा फायदा झाला? बँकेचा फायदा न होता तुम्ही कर्जमुक्ती कसं करणार आहात? असे सवालही त्यांनी केले.
