मारहाण प्रकरणी व्यापाऱ्यांचा मोर्चा; अविनाश जाधवांचे भाजपवर गंभीर आरोप

मराठी न बोलल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यावसायिकाला मारहाण केली होती. या विरोधात आता व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मीरा रोडवर व्यापाऱ्यांकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.

मारहाण प्रकरणी व्यापाऱ्यांचा मोर्चा; अविनाश जाधवांचे भाजपवर गंभीर आरोप
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 03, 2025 | 3:17 PM

मराठी न बोलल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यावसायिकाला मारहाण केली होती. या विरोधात आता व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मीरा रोडवर व्यापाऱ्यांकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनात व्यापाऱ्यांसोबतच शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान त्यानंतर आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले अविनाश जाधव? 

आम्हाला हा वाद संपवायचा होता, पण येथील एका भाजप नेत्याने लोकांना निषेध करण्यास सांगितले. फक्त 40 सेकंदांचा व्हिडिओ मीडियामध्ये दाखवण्यात आला आणि उर्वरित व्हिडिओ दाखवण्यात आला नाही. 40 सेकंदाचा व्हिडिओ कट करून सगळीकडे पसरवण्यात आला, तो व्हिडिओ सगळ्यात पहिला कोणी पसरवला?  या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीतून हा वाद सुरू झाला, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही महाराष्ट्रात राहाता, मीरा-भाईंदरमध्ये करोडो रुपयाचे दुकान विकत घेतले आहे, आणि तुम्हाला महाराष्ट्राची भाषा माहीत नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तुम्ही एवढे वर्ष महाराष्ट्रात राहात आहात, महाराष्ट्रात पोट भरत आहात, इथल्या कोळी, आगरी समाजाच्या जागा विकत घेतल्या आणि त्यांच्या जीवावर तुम्ही हे सगळं उभं केलं.

महाराष्ट्रात राहाता तुमचे करोडो रुपयाचे दुकान आहे, मीरा-भाईंदर मध्ये विकत घेतले आणि तुम्हाला महाराष्ट्राची भाषा माहीत नाही? ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय तुम्ही एवढे वर्ष राहिलात महाराष्ट्रात पोट भरलं इथल्या आगरी कोळी समाजाच्या जागा विकत घेतल्यात आणि त्यांच्या जीवावर तुम्ही हे सगळं उभं केलं, त्या आगरी कोळी समाजाची भाषा तुम्हाला माहीत नाही? गर्दी जमवून एखाद्या गोष्टीचा अशापद्धतीनं निषेध करणे योग्य आहे का?जर हे ठीक असेल तर आपण आगरी कोळी मराठी लोकांसह एक मोठं आंदोलन सुरू करायचं का? असा सवाल यावेळी जाधव यांनी उपस्थित केला आहे.