बबनराव… थोडा आधी निर्णय घ्यायला हवा होता; एकनाथ शिंदे यांनी उद्गार काढताच…

| Updated on: Apr 06, 2024 | 9:13 PM

माझा शिवसेनेत प्रवेश होत आहे. अनेक दिवस मी सांगत होतो. मी तिकडे 54 वर्ष निष्ठने काम करत होतो. पण उबाठामध्ये मला डावललं. मी पक्षाचा राजीनामा दिला. मला कुणी विचारलंही नाही. म्हणूनच मी आज एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारत आहे. माझ्यावर जबाबदारी टाकावी. मी न्याय देईल, असं माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप म्हणाले.

बबनराव... थोडा आधी निर्णय घ्यायला हवा होता; एकनाथ शिंदे यांनी उद्गार काढताच...
baban gholap
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बबनराव घोलप चांगला निर्णय घेतला. थोडा उशिरा निर्णय घेतला. हरकत नाही. देर आये पर दुरुस्त आये. कोणी पक्षप्रवेश केला की त्यांना कचरा म्हणतात. उद्यापासून तुम्हालाही असं म्हटलं जाईल. सर्वांवर आरोप करायचे आणि आपण नामेनिराळे राहायचे हे चालू आहे. बबनरावांनी माझ्याकडे कोणतीही मागणी ठेवली नाही. ते राज्यभर समाजासाठी काम करणार आहेत. त्यांच्या काही मागण्या होत्या. त्यावर चर्चा झाल्या. त्यावर निर्णयही घेतले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी हे उद्गार काढताच बबनराव घोलपही भावूक झाले.

ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वच प्रश्नांची उत्तरे देताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाही चढवला. बबनराव घोलप आमच्यासोबत आले. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी खांद्यावर भगवा घेतला आहे. त्यांना तिकडे जो अनुभव आला, तोच अनुभव आम्हालाही आला आहे, असा उद्धव ठाकरे यांना टोला लगावतानाच बबनराव, तुम्ही चर्मकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनच काम करायचे आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राजस्थानातील दोन आमदार उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

400 पारचा नारा

केंद्र आणि राज्य सरकारच्या कामामुळे लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंगोली आणि यवतमाळ येथील सभांना लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही आता 400 पारचा नारा दिला आहे. आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरलेला आहे. पण त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा उमेदवारच नाही, असा हल्लाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवर चढवला.

आधी लगीन…

श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी उशिराने घोषित करण्यात आली. तीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केली. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले. त्यावर, आधी लगीन कोंडाण्याचे, नंतर रायबाचे. आमच्या जागी दुसरे कोणी असते तर आधी लगीन मुलाचे केले असते, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

त्यांच्याकडे अजेंडाही नाही

आमच्याकडे एका जागेसाठी दहा दहाजण इच्छुक आहेत. दोन प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसचे काय हाल केले ते आपण पाहत आहोत. काही लोकांकडे भूमिका नाही आणि अजेंडाही नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.

तिकडे कोंडी

आज आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमच्याकडे चर्चा होते. आम्ही सर्वांना बोलायला देतो. आम्ही कुणाची कोंडी करत नाही. तिकडे कोंडी होते. तिकडे जरा लक्ष द्या. आम्ही राज्यात 45 पार करणार आहोत, असा दावाही त्यांनी केला.

आगे आगे देखो…

सांगलीतील जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात प्रचंड वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने परस्पर सांगलीचा उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत. त्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोले लगावले. आता तर सुरुवात झालीय. आगे आगे देखो होता है क्या, असं सूचक विधान त्यांनी केलं.