
आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठकारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, या भेटीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे 6 वर्षांपूर्वी मातोश्रीवर गेले होते. आपला मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते, त्यानंतर ते आज पुन्हा एकदा मातोश्रीवर आले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीमुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या भेटीनंतर सोशल मीडियावर एक पोष्ट शेअर केली आहे, या पोस्टमधून त्यांनी देखील युतीबाबत सूचक विधान केलं आहे. 2 पक्ष एकत्र येऊन लढतात तेव्हा त्यांची ताकद 1+1 =2 अशी होते. पण जेव्हा 2 ठाकरे एकत्र येतात तेव्हा हीच ताकद 1+1=11 होते. असं सूचक विधान नांदगावकर यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले नांदगावकर?
‘1+1= 11
आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राजसाहेब यांनी मातोश्री वर जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेबांच्या वास्तव्याने आमच्यासाठी पवित्र झालेले मोतोश्रीत जाऊन माझ्या ही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
2 पक्ष एकत्र येऊन लढतात तेव्हा त्यांची ताकद 1+1 =2 अशी होते. पण जेव्हा 2 ठाकरे एकत्र येतात तेव्हा हीच ताकद 1+1=11 होते. आज उद्धव साहेबांना सगळ्यात मोठे आपुलकीचे गिफ्ट हे आज राजसाहेबांनी दिले. बाळासाहेब हा सुवर्णक्षण बघायला आज खरच आपण हवे होता, आपला मातोश्री बंगला आज दोन्ही बंधूंना एकत्र बघून नक्कीच आनंदी झाला आहे.’ अशी पोस्ट नांदगावकर यांनी या भेटीवर केली आहे.
दरम्यान त्रिभाषा सूत्राचे दोन्ही अध्यादेश मागे घेतल्यानंतर पाच जुलै रोजी मुंबई विजयी मेळावा पार पडला होता, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधुंची उपस्थिती होती, तेव्हापासूनच शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.