Harshavardhan Sapkal : राष्ट्रवादीलाच सुनेत्रा पवार यांच्या निवडणुकीशी देणंघेणं नव्हतं का? हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट ठेवलं दुखऱ्या नसेवर बोट
बारामती पोटनिवडणुकीत अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला आहे. काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी अजित पवारांच्या विमान अपघाताची रीतसर चौकशी (FIR) करण्याची अट ठेवली आहे. रोहित पवारांनी बिनविरोध निवडणुकीची विनंती केली, मात्र काँग्रेस नेते सपकाळ यांनी महायुतीवर संपर्क न साधल्याबद्दल नाराजी व्यक्त करत ही अट कायम ठेवली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर तीन महिन्यांनी आता बारामती विधानसभा संघात पोटनिवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना संधी देण्यात आली आहे. इतके दिवस ही निवडणूक बिनविरोध होईल असं बोललं जात होतं, मात्र काँग्रेसने तिथे उमेदवार उभा केल्याने या निवडणुकीने अनपेक्षित वळण घेतलं आहे. काँग्रेसने आकाश मोरे यांना निवडणुकीत उभं केलं असून याच मुद्यावरून सध्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी,यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान याच मुद्यावर राज्यातलं वातावरण तापलेलं असताना आज शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचे नेते, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत चर्चा केली. काँग्रेसने बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत महाराष्ट्रात रितसर गुन्हा दाखल व्हावा. जर ही मागणी पूर्ण झाली, तर मी बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे, अशी अट काँग्रेसतर्फे ठेवण्यात आली होती. या सर्व मुद्यावर सपकाळ सविस्तर बोलले. आमची अट, शर्त कुठल्याही प्रकारे चुकीची नाही. खरतर त्या अटीची गरजच नव्हती, असे ते म्हणाले. आमच्याशी कुणी संपर्क साधला नाही. राष्ट्रवादीचे खासदार राज्यसभा आणि लोकसभेत आहे. आमच्या दिल्लीतील नेत्यांनी भेटले नाही. 15 मार्चला निवडणुकीची घोषणा झाली, 15 मार्चपासून 5 एप्रिलपर्यंत त्यांनी संपर्क का साधला नाही. राष्ट्रवादीलाच सुनेत्रा पवार यांच्या निवडणुकीशी काही घेणं देणं नव्हतं का? असं म्हणत काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे. का मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पक्षाकडेच त्यांनी या निवडणुकीची सगळी सूत्र सोपवली होती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ ?
आमची अट चुकीची नाही. आमच्या उमेदवारांनी स्थानिक पातळीवर भूमिका घेतली की अजित दादांच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्रात गुन्हे दाखल करावे आणि मग मी माघार घेतो, ही त्यांची भूमिका होती. त्यावर आम्ही अजूनही ठाम आहोत. मात्र गुन्हा दाखल करावा यासाठी पोलिसांशी हुज्जत घालावी लागते, गुन्हा महाराष्ट्रात दाखल होत नाही म्हणून कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करावा लागतो. हा तर सरकारचा वाभाडे निघण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस किती श्रूड आहेत, या गोंधळात ते गुन्हा नोंदवून देत नाहीत अजित दादांच्या अपघाताची चौकशी होऊ देत नाही , हे झारीतले शुक्राचार्य म्हणून फडणवीस बसले आहेत, अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी टीकास्त्र सोडलं.
बारामतीत 53 अर्ज दाखल, त्यावर कोणीच का बोलत नाही ?
बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला म्हणून काँग्रेसकडे बोट दाखवणं चुकीचं आहे. तिथे एकूण 53 अर्ज दाखल झाले आहे पण त्यावर कोणी बोलत नाही. भाजपला बिनविरोध शब्दाचा पुळका आला आहे. तुम्ही एक पॅटर्न सुरू केला आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत. त्यांनी पालिका, नगरपंचायतमध्ये लोकांना पैसे देऊन अर्ज मागे घ्यायला लावले, धमक्या दिल्या, कॉलर पकडून अर्ज मागे घ्यायला लावले. साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. निकोप वातावरणात निवडणूक झाल्या पाहिजे हे सर्वांचं म्हणणं होतं. पण भाजपने तसं केलं नाही असंही सपकाल म्हणाले.