असा समुद्र मराठ्यांना कधीच बघायला मिळणार नाही, या लढाईचे तुम्ही साक्षीदार व्हा, जरांगे पाटील यांचा चलो मुंबई नारा
२७ ऑगस्टच्या आधी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर ठीक अन्यथा मी कोणत्याही मंत्र्याचे ऐकणार नाही.सगळ्याच पक्षातील नेत्यांना आवाहन की लेकरांच्या भवितव्यासाठी मुंबईला चला. मराठ्यांच्या विजयासाठी आणि गरिबांच्या भल्यासाठी मुंबईकडे चला.तुम्ही सर्वजण एकच दिवस या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आमची असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबईला निघताना प्रत्येकाने आपआपली वाहने घेऊन निघायचे आहे. गेल्यावेळी आम्ही शांततेत गेलो आणि शांततेत आलो. आताही शांततेत जाणार आणि शांततेत येणार आहे. परंतू यावेळी आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय माघारी परतणार नाही. तीन वर्षांचा कालावधी आम्ही दिलेला होता. इतका वेळ कोणीच देत नाही. आम्ही सगेसोयऱ्याचे अध्यादेश काढणार या आश्वासनाला भुललो आणि परत आलो. परंतू आता आरपारची लढाई आहे, ज्यांना सामील व्हायचे त्यांनी यावे, असा जनसमुद्र मराठ्यांना कधीच बघायला मिळणार नाही, या लढाईचे तुम्ही साक्षीदार व्हा असे आवाहन करीत मराठा नेते मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
एक घर, एक गाडी
कालपासून आम्ही नवीन मोहीम राबवली. सर्वत्र सभा घेतल्यानंतर बांधवांची चर्चा करतोय. धाराशिवपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे.सोलापूरनंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि अहिल्यानगर दौरा असणार आहे. हा दौरा झाल्यानंतर मराठा बांधवांची चर्चा करून २९ ऑगस्ट रोजी सर्वांनी जायचं आहे. ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं, एक घर, एक गाडी निघणार असा नारा सोलापुरातून देतो आहे असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
पाच हजार पाण्याचे टँकर लागणार
मुंबई जाताना शांततेत जायचं आणि शांततेत यायचं आहे.विजय मिळवल्याशिवाय परत यायचं नाही.सरकारने जर आपली माणसं आंदोलनात घुसवले तर एक इंचही मागे सरायचं नाही. मराठ्यांनी कुठेही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. मुंबईकडे जाण्यासाठी पाच हजार पाण्याचे टँकर लागणार आहेत. मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा असा निर्धार आहे. अंतरवाली सराटी येथून सकाळी दहा वाजता आम्ही निघणार आहोत असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
जरांगे यांचे आवाहन
शिवनेरीचा पहिला मुक्काम करावा लागेल आपले फक्त पंधरा किलोमीटरचे अंतर आहे. शिवनेरीवरून चाकण, राजगुरुनगर, लोणावळा, आझाद मैदान मार्गे जावं लागेल. यात जर मुलांचे हाल होत असेल तर मार्ग बदलावा लागेल. आम्ही निवडणूक आल्या म्हणून आंदोलन कधीच करत नाही. तुम्ही आजी – माजी नगरसेवक, नेते या सर्वांना सांगा की आमच्यासोबत मुंबईला चला कारण आम्ही तुमच्यासाठी झटलो आहोत. आम्ही तुमचा प्रचार करून गुलाल उधळून डोळे फोडून घेतो तर तुम्ही आमच्या लेकरा बाळांना मोठं करण्याच्या वेळेस आलं पाहिजे असेही जरांगे यावेळी आवाहन करीत म्हणाले.
तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही
सरकारकडे ५८ लाख कुणबी असल्याच्या नोंदी आहेत, त्यामुळे त्यांना कायदा पारित करावा लागेल. आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक आहेत असा जीआर काढायला काही हरकत नाही. हैद्राबाद गॅझेट, सातारा संस्थान गॅझेट , बॉम्बे अनुसंस्था गॅझेट हे आम्ही घेणार आहोत कारण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण त्यात बसू शकतो. जोपर्यंत सरकारकडून कुणबी आणि मराठा एकच आहेत हा अध्यादेश येत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.
म्हणून आम्ही सरकारला तीन वर्षाचा वेळ दिला
राज्यातले सरसकट गुन्हे मागे घेण्याचा आदेश सरकारने त्यावेळी केला होता. सहा महिन्यात सगे सोयऱ्याची अधिसूचना काढण्याची ग्वाही दिली होती तिथं आमची फसवणूक झाली, आमची मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे.मराठा आरक्षणासाठी जीव दिलेल्या लोकांच्या आर्थिकतेचा विचार केला जावा.अशा अनेक मागण्या आहेत जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. गेल्यावेळी आमची फसवणूक झाली यावेळी आम्ही माघार घेणार नाही. काही वेळा कधी – कधी चार पावलं माघारी घ्यावं लागतं, मला आणि माझ्या समाजाला कोणी आडमूठं म्हणू नये म्हणून आम्ही सरकारला तीन वर्षाचा वेळ दिला एवढा वेळ देशात कोणीही दिला नाही असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
