
Beed Bjp Leader Joins NCP : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यभरात आता मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते, कार्यकर्ते सोईच्या पक्षात उडी घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यात काही माजी आमदार, मंत्र्यांचाही समावेश आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बीड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे एका बड्या नेत्याने आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या नेत्याच्या निर्णयामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघ तसेच बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच बदलणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आष्टी मतदारसंघात 20 वर्ष विधानसेभेचे नेतृत्व करणारे माजी आमदार भीमराव धोंडे मंगळवारी म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी पक्षातील प्रवेश निश्चित झाल्यानंतर अजितदादांचे नेतृत्व हे विकसनशील आहे, खंबीर आहे, अशी स्तुतीसुमने भीमराव धोंडे यांनी उधळली आहेत. तसेच दादांचा वादा पक्का आहे. ते दिलेला शब्द पाळतात, असे म्हणत भविष्यात मोठी जबाबदारी मिळण्याचेही संकेत धोंडे यांनी दिले आहेत. येत्या 11 नोव्हेंबर रोजी ते शेकडो कार्यकर्त्यांसोबत अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांनी सुमारे 20 वर्षे बीड जिल्ह्यातील आष्टी या मतदारसंघाचे नेतृत्त्व केलेले आहे. धोंडे यांच्या या निर्णयमुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाचे नेते तथा आमदार सुरेश धस यांना आव्हान देण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे आपली ताकद लावणार असून ते आणि बाळासाहेब आजबे हे एकत्र काम करणार आहेत.
धोंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे आष्टी मतदारसंघात आमदार सुरेश धस यांना माजी आमदार धोंडे आणी माजी आमदार आजबे येणाऱ्या निवडणुकीत मोठे आव्हान देण्याची शक्यता आहे. धोंडे यांच्यामुळे आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद चांगलीच वाढणार आहे.
दरम्यान, धोंडे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या भविष्यकालीन योजना सांगितल्या आहेत. महेश सहकारी साखर कारखाना मला चालू करायचा आहे. कर्करोगावर मोफत उपचार करणारे रुग्णालयही मला सुरू करायचे आहे, असे भीमराव धोंडे यांनी सांगितले आहे. तसेच आष्टी मतदारसंघातील हजारो युवकांना व नागरिकांच्या हाताला काम मिळावे यासाठी मी अजित पवार गटात प्रवेश करत आहे, असे म्हणत भविष्यात आष्टी मतदारसंघातील राजकारण चांगलेच पेटणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.